मुंबई -माहितीपट, लघुपट आणि अँनिमेशनपटांच्या 17 व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे ( Mumbai International Film Festival ) (एमआयएफएफ -2022) आज 29 मे, 2022 रोजी मुंबईतील नेहरू सेंटर, वरळी येथे रंगतदार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल ( Union Minister Piyush Goyal ) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महोत्सव पहिल्यांदाच ऑनलाइन स्वरूपात सादर होत असून ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा मिश्र स्वरूपात रसिकांना त्याचा आनंद घेता येईल. चित्रपट प्रेमींना स्पर्धा आणि प्रिझम श्रेणीतले चित्रपट त्यांच्या वैयक्तिक संगणकांवर पाहता येतील ऑनलाइन नोंदणी सर्वांसाठी विनाशुल्क आहे. मिफ्फ महोत्सवात बांग्लादेशची 'कंट्री ऑफ फोकस' म्हणून निवड, समीक्षकांनी गौरवलेल्या 'हसीना-अ डॉटर्स टेल' या चित्रपटाचाही या पॅकेजमध्ये समावेश करण्यात आला आहे.
यंदाचा 'डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' :ज्येष्ठ माहितीपट निर्माते आणि सुप्रसिद्ध सिनेलेखक संजीत नार्वेकर यांना यंदाचा 'डॉ. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून सिनेसृष्टीत त्यांनी दिलेले योगदान, विशेषतः चित्रपटांचा इतिहास आणि माहितीपट निर्मिती चळवळीविषयी त्यांनी केलेल्या रंजक लिखाणाबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांनी सिनेमा विषयाशी संबंधित 20 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आणि संपादित केली आहेत. त्यांच्या 'मराठी सिनेमा इन रेट्रॉस्पेक्ट' ला सुवर्णकमळ पुरस्कारही मिळाला आहे.