मुंबई - कोरोना संक्रमणाच्या दुसरा लाटेवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असताना राज्यात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्या असल्याचेही समोर आले आहे. जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या दरम्यान मुंबई शहरात घडलेल्या चोरी, दरोडा, लुटीच्या संदर्भात गुन्ह्यांचा आढावा घेणारी ही विशेष बातमी.
हेही वाचा -पीक कर्ज नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळणार 0 टक्के व्याजाने
जानेवारी 2021 ते एप्रिल 2021 या 4 महिन्यांच्या काळात मुंबई शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या 94 पोलीस ठाण्याच्या अंतर्गत वाहन चोरीचे तब्बल 1 हजार 98 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून यामध्ये 405 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. चोरीचे तब्बल 1 हजार 387 गुन्हे नोंदविण्यात आल्यानंतर यामध्ये 495 गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आलेली असून घरफोडीचे 537 गुन्हे मुंबईतील वेगवेगळ्या परिसरात घडले असताना यामध्ये केवळ 237 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे. चेन स्नॅचिंगचे 42 गुन्हे मुंबईत घडले असून यामध्ये 26 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला असताना रॉबरीचे तब्बल 246 गुन्हे या दरम्यान घडलेले असून 215 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केलेला आहे.