मुंबई -पूर, महापूर, अतिवृष्टी, ( Heavy rain ) दरड कोसळणे अशा पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीत ( Natural calamities during monsoons ) होणाऱ्या जीवितहानीनंतर सर्वाधिक मानव, पशुधनाचे बळी जातात ते वीज कोसळल्यामुळे. दर पावसात वीज कोसळण्याच्या घटना सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. तसेच या घटना अवकाळी पावसाच्या काळात देखील घडतात. याबाबत जी माहिती समोर आली आहे, त्या अनुषंगाने मागील सहा महिन्यात राज्यात वीज कोसळून विविध ठिकाणी तब्बल १५७ बळी गेले आहेत, तर हजारो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
विदर्भात ८४ मृत्यू -राज्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये वीज कोसळून मनुष्य, पशुधनाचे बळी ( livestock ) जात असतात. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माणसानेच सावध राहणे गरजेचे आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार यंदा राज्यात १५७ बळी हे मागील सहा महिन्यात वीज कोसळून गेले आहेत. यामध्ये सर्वाधिक जास्त विदर्भात ८४ मृत्यू झाले असून त्या पाठोपाठ मराठवाड्यात ४६ मृत्यू झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रात १७ तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईमध्ये १० मृत्यू झाले आहेत. सर्वाधिक ४५३ जनावरांचा मृत्यू मराठवाड्यात झाला असून विदर्भात ३५०, उत्तर महाराष्ट्र ६४, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबईत १०५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर, एकंदरीत ८० जण वीज कोसळून मागील सहा महिन्यात जखमी झाले आहेत.
मृत्यू झाल्यास ४ लाखांची मदत -वीज कोसळून मृत्युमुखी पडल्यास मृतांच्या वारसाला ४ लाख रुपये मदत मिळते. तसेच अंगावर वीज पडून अपंगत्व आल्यास हे अपंगत्व ६० टक्क्यांच्या वर असल्यास २ लाख रुपये दिले जाते. आतापर्यंत मदतीच्या बाबतीत सांगायचे झाले तर, विदर्भात झालेल्या एकूण ८४ मानवी मृत्यूमध्ये २२ मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळाली आहे. तर, ६२ प्रकरणे बाकी आहेत. मराठवाड्यात झालेल्या ४६ मानवी मृत्यूंमध्ये २९ मृतांच्या वारसाला नुकसान भरपाई मिळाली असून १७ प्रकरणे बाकी आहेत. उत्तर महाराष्ट्रात झालेल्या १७ मानवी मृत्यूमध्ये ५ मृत्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळाली असून १२ प्रकरणे बाकी आहेत. तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई सहित झालेल्या १० मानवी मृत्यू पैकी ५ मृत्यांच्या वारसांना नुकसान भरपाई मिळाली असून ५ प्रकरणे बाकी आहेत. विशेष करून मुंबई, सोलापूर, कोल्हापूर,रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे मागील सहा महिन्यात वीज कोसळून एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही आहे.