मुंबई -कोरोना विषाणूवर लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी ब्लू प्रिंट बनवली आहे. मुंबईत पाच टप्प्यांत लसीकरण होणार असून, पहिल्या टप्प्यात सव्वा लाख डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी ५ कर्मचाऱ्यांची ५०० पथके तयार ठेवणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि सिटी टास्क फोर्सचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. धार्मिक सणांनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. आता मात्र रुग्ण संख्या आटोक्यात आली आहे. याच दरम्यान केईएम आणि नायर रुग्णालयात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोव्हीशिल्ड लसीचा अभ्यास सुरू आहे. त्याचवेळी पालिकेच्या सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीची चाचणी सुरू करण्यात आली आहे. याचा अभ्यास करून लवकरच लस उपलब्ध होणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने लसीच्या साठवणुकीसाठी कांजूरमार्ग येथे विशेष कोल्ड स्टोरेज सेंटर तैनात ठेवले आहे. याशिवाय पालिकेच्या चार मोठ्या रुग्णालयांमध्येही लस साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज यंत्रणा तयार असल्याची माहिती काकाणी यांनी दिली. लसीकरणासाठी एकूण ५०० पथके तयार करण्यात येतील. कोरोना लस सुरुवातीला केवळ पालिकेच्या माध्यमातून दिली जाईल. कोणत्याही खासगी संस्थेला याची परवानगी नसेल. ही लस मोफत दिली जाईल की पैसे आकारले जातील याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनंतर घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नोंद केंद्रीय स्तरावरील ऍपवर
कोरोनाची लस घेणाऱ्या प्रत्येकाची नोंद केंद्रीय स्तरावर तयार करण्यात आलेल्या मोबाईल ऍपवर करण्यात येईल. यावर रजिस्टर मोबाईल नंबर नोंदणी केल्यानंतर मोबाईलवर ओटीपी येईल. यानंतर पुढील प्रक्रिया पार पडेल. व्हॅक्सिनेशन केंद्रावर पाच कर्मचारी असतील. यामध्ये ओळख करणारा कर्मचारी, लस देणारा कर्मचारी, मदतनीस, सुरक्षा आणि एक अतिरिक्त कर्मचारी असेल. लसीकरणासाठी 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेतील सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.