मुंबई- प्रदेश काँग्रेसची बैठक मंगळवारी (दि. 26 एप्रिल) मुंबईत विधानभवनात पार पडली. सध्या राज्यात असलेली राजकीय परिस्थिती व एकंदरीत सुरक्षेच्या मुद्यावरून निर्माण झालेला वाद यासह गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना झालेली अटक या विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली. आमदार जिग्नेश मेवाणी यांना ज्या पद्धतीने स्थानिक न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर करूनही नंतर त्यांना ताबडतोब अटक केली. त्याबाबत प्रदेश काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती काँग्रेस नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Minister Balasaheb Thorat ) यांनी दिली.
जिग्नेश मेवाणीवर अन्याय केला -यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले, आज काँग्रेस विधिमंडळाची बैठक झाली. आमदार जिग्नेश मेवाणी यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केल्यानंतरही दुसऱ्या क्षणी पोलिसांनी त्यांना अटक केली. हे अन्यायकारकर असून गुजरात सरकार कायद्याचे उल्लंघन करत आहे. अशा प्रकारे पुरोगामी लोकांना त्रास देण्याचे काम हे सरकार करत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी व याबाबत माहिती देण्यासाठी काँग्रेसचे शिष्टमंडळ सायंकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.