मुंबई -विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Election 2021) कोल्हापूर मतदार संघात गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्यांच्या विरोधात भाजपाच्या वतीने अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, सद्य स्थिती पाहता कोल्हापूर जिल्ह्यात महा विकास आघाडीला सहज विजय मिळेल, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
गोकुळच्या दूध पिशव्यांना पाच पदर
दुधात अनेक ठिकाणी भेसळ होण्याच्या घटना समोर येत आहेत. दुधात भेसळ करण्यासाठी काही रसायने तर कित्येकदा अस्वच्छ पाणी वापरले जाते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ होत असल्याने यावर कडक निर्बंध घालण्याचा प्रयत्न गोकुळ दूध संघ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री तथा गोकुळ दूध संघाचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. गोकुळचे दुध वितरित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांना आता पाच पदर करण्यात येणार आहेत. यामुळे दुधामध्ये सहजासहजी भेसळ करणे अशक्य होणार आहे. तरीही कुणी भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास ते तात्काळ नजरेस येणार आहे. त्यामुळे प्राथमिक स्तरावरच भेसळ रोखली जाईल, असा विश्वास गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.