मुंबई -मुंबईत कोरोनाला वर्ष पूर्ण झाले असताना पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सध्या मुंबईत आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी ९० टक्के रुग्ण इमारतींमध्ये आहेत. त्यामुळे पालिकेने इमारतींवर अधिक लक्ष वेधले असून येथे नियमांची कडक अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मागील १० दिवसांत ७९९ मजले, ८३ इमारती आणि १६ कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे. तर सद्यस्थितीत मुंबईत २२८ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सील मजले, भागांची संख्या २८१५ झाली असून चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोनची संख्या २७वर पोहोचली आहे.
इमारती सील
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाविषाणूने शिरकाव केल्यानंतर इमारती, नंतर झोपडपट्ट्या आणि पुन्हा इमारतींकडे आपला मोर्चा वळवला होता. दाटीवाटीच्या चाळी-झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला. आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीसह वरळी कोळीवाडा, मानखुर्द, गोवंडी, कुर्लासारख्या भागात कोरोनारुग्णांची वाढ होऊन या झोपडपट्ट्या ‘कोरोना हॉटस्पॉट’ जाहीर करण्यात आल्या. मोठ्या प्रयत्नांनंतर या ठिकाणचा कोरोना आटोक्यात आला. आता पुन्हा कोरोना रुग्णवाढ होत असताना चाळी-झोपडपट्ट्यांपेक्षा इमारतींमध्ये कोरोनारुग्ण जास्त आढळत आहेत. मागील १० दिवसांत ७९९ मजले, ८३ इमारती आणि १६ कंटेनमेंट झोनची वाढ झाली आहे. तर सद्यस्थितीत मुंबईत २२८ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सील मजले-भागांची संख्या २८१५ झाली असून चाळी-झोपडपट्ट्यांमधील कंटेनमेंट झोनची संख्या २७वर पोहोचली आहे.