महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठा समाजाला दिलासा.. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठा समाजाला दिलासादायक ठरणारे अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री मंत्री अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनेक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

state cabinet meeting
अशोक चव्हाण

By

Published : Sep 22, 2020, 8:23 PM IST

Updated : Sep 22, 2020, 8:39 PM IST

मुंबई - मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, अशी माहिती मंत्री अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मराठा आरक्षण प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते, विविध विभागांचे मंत्री, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सर्व विधीज्ञ यांच्यासोबत केलेल्या चर्चेनुसार राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे सरकारकडून २१ सप्टेंबरला विनंती अर्ज दाखल केला आहे. या कामी दिलेले स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतले आहेत असे सांगितले.

अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय -

आर्थिकदृष्ट्या दूर्बल घटकांसाठी असलेला लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येईल.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती ती तशीच आता इडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी ६०० कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता इडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. त्यासाठी ८० कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अधिक गतीमान करण्यात येईल.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी रु. १३० कोटीची मागणी केलेली आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भागभांडवल ४०० कोटीने वाढविण्यात आले आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.

मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.

मराठा क्रांती मोर्चामधील आंदोलकांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे. आजमितीस शासनाकडे फक्त २६ प्रकरणे प्रलंबित आहेत त्यावरही एका महिन्यात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल.

Last Updated : Sep 22, 2020, 8:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details