मुंबई- देशातील कोरोनाचा कहर आटोक्यात येत नसताना या विषाणूमुळे कोरोना योध्यांनाही जीव गमवावे लागत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 196 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही बाब धक्कादायक आणि चिंताजनक आहे.
कोरोनाशी लढणारे योध्दाच मृत्युमुखी पडत असल्याने आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे, असे म्हणत आयएमएने 7 ऑगस्टला पंतप्रधानांना एक पत्र पाठवले आहे. त्यानुसार आपल्या अडचणी मांडत डॉक्टरांचे मृत्यू रोखण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली आहे.
कोरोना हा सर्वात वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. अशावेळी डॉक्टर हे थेट रुग्णांच्या संपर्कात येत आहेत. पीपीइ किटचा वापर केल्यानंतर ही डॉक्टरांना कोरोनाची लागण कोणत्या ना कोणत्या माध्यमातून होत आहे. त्यामुळेच आतापर्यंत मोठ्या संख्येने डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. कोरोनावर मात करत अनेक डॉक्टर पुन्हा रुग्णसेवा करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. मात्र त्याचवेळी अनेक डॉक्टरांना कोरोनामुळे जीव गमवावा लागत आह, हेही तितकेच खरे आहे. आयएमएच्या एका अहवालानुसार आतापर्यंत देशातील 196 आयएमए सदस्य डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
याआधी महिन्याभरापूर्वी आयएमएने रेड अलर्ट देत पहिली आकडेवारी जाहीर केली होती. तेव्हा देशात 99 डॉक्टर कोरोनामुळे दगावले होते. महिन्याभरात हा आकडा वाढून 196 वर गेला आहे. जवळपास दुपटीने हा आकडा वाढल्याने आयएमएचीही चिंता वाढली आहे. दरम्यान, 196 डॉक्टरांमध्ये 170 डॉक्टर हे 50 च्या पुढचे आहेत. डॉक्टरांनाच वेळेत बेड उपलब्ध होत नसल्याने वा त्यांची टेस्ट होत नसल्याने डॉक्टर गंभीर होऊन त्यांचा मृत्यू होत आहेत, असा आरोप सातत्याने होत आहे. तर पीपीई किटच्या गुणवत्तेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अशात आता डॉक्टरांचा मृत्यूचा आकडा वाढत असल्याने आयएमएने डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काही तरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले आहे. तर सरकारी डॉक्टर-कर्मचारी यांना आरोग्य विमा मिळत आहे. पण खासगी डॉक्टरही जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा देत असून ते ही मृत्युमुखी पडत आहेत. तेव्हा त्यांनाही 50 लाखाचा आरोग्य विमा लागू करावा, अशी ही मागणी या पत्रात करण्यात आली आहे.