मुंबई - सरकार-पालिका डॉक्टरांप्रमाणे राज्यभरातील इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे खासगी डॉक्टर जीवाची पर्वा न करता कॊरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. अशावेळी त्यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या अडचणीच राज्य सरकारकडून वाढवल्या जात आहेत. कधी खासगी रुग्णालयाचे दर निश्चित करत तर कधी रुग्णालयावर कारवाई केली जात आहे. याविरोधात आयएमए महाराष्ट्र आक्रमक झाली आहे. त्यानुसार आता त्यांनी उद्या, 9 सप्टेंबरपासून राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.
उद्या कॊरोनामुळे मृत्यू झालेल्या राज्यातील आयएमए डॉक्टरांना श्रद्धांजली वाहत आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर 10 सप्टेंबरला मुंबईसह राज्यातील विविध सरकारी कार्यालयासमोर सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. खासगी डॉक्टरही सरकार-पालिका डॉक्टरांइतकेच काम करत आहेत. मात्र, त्याचवेळी त्यांना पीपीई किट, एन 95 मास्क उपलब्ध करून देण्याची बाब असो वा इतर सुविधा या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. आजही खासगी डॉक्टर स्वखर्चाने महागडी पीपीई किट, मास्क खरेदी करत आहेत. त्यात दुसरीकडे एका कॊरोना रुग्णासाठी मोठा खर्च येत असताना सरकारकडून अन्यायकारक दर खासगी रुग्णालयांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. हे दर निश्चित करताना डॉक्टरांच्या प्रतिनिधींशी वा आयएमएशी चर्चा न करता सरकार परस्पर दर ठरवत आहे. तर या अन्यायकारक दराविषयी चर्चा करण्यासाठी वेळ मागितला तर तो दिला जात नाही, असा आरोप आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी केला आहे.