मुंबई - चंदीगडमधील घटना ताजी असतानाच मुंबईमध्येदेखील एका हॉस्टेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मात्र, वेळीच आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आयआयटी हॉस्टेलमधील मुलींच्या वॉशरूममध्ये डोकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव पिंटू असून तो कँटीनमध्ये काम करत होता. आरोपीकडून कुठलेही फुटेज आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांकडून चौकशी सुरु ( IIT Bombay hostel canteen ) आहे.
आयआयटी मुंबईने या घटनेचा निषेध केला आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं आहे.चंदिगढमधल्या मुलींच्या हॉस्टेलमधले काही व्हिडीओ व्हायरल झाल्याची घटना ताजी असतानाच हा गंभीर प्रकार मुंबईत घडल्याचं समोर आला आहे. पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बुधन सावंत यांनी सांगितले की, आमच्याकडे तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही आरोपीला रविवारी रात्री चौकशीसाठी बोलावले आणि नंतर चौकशी दरम्यान अटक केली. आरोपी विरोधात आयपीसी कलम 354 सी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू-आयआयटी मुंबईच्या विद्यार्थीनीने पवई पोलिसांत एक तक्रार दाखल केली आहे. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याने रविवारी रात्री लेडीज हॉस्टेलच्या 10 (H10) बाथरुमच्या खिडकीतून तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. पवई पोलिसांनी गुन्हा दाखल करून या २२ वर्षांच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये अद्याप तसा कोणताही व्हिडीओ सापडलेला नाही. बुधवारी या आरोपीला न्यायालयात हजर केले जाईल. आरोपीने विद्यार्थीनीच्या बाथरुममध्ये डोकावण्यासाठी ज्या पाईपचा वापर केला होता तो पाईप बंद करण्यात आल्याचे आयआयटी प्रशासनाने म्हटले आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलू, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.