मुंबई- कोरोना महामारीने मुंबईसह देशातील आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. देशाची आरोग्य व्यवस्था पांगळी असून, ही व्यवस्था सुधारण्यासाठी 75 वर्षात कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणाऱ्या भोर समितीच्या शिफारशी कागदावरच ठेवल्या आणि आज आपण त्याचे दुष्परिणाम भोगत आहोत, असे परखड मत ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांनी मांडले आहे. तर, आता कॊरोनाने आरोग्य क्षेत्र हेच सर्वात महत्वाचे हे अधोरेखित केल्याने आता तरी केंद्र सरकारने जागे होत जीडीपीच्या 5 टक्के रक्कम आरोग्य क्षेत्रावर खर्च करण्याची गरज आहे. तशी मागणी केल्याचेही डॉ सुरासे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा -सोशल मीडिया डे: जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या 'नेटवर्क' बद्दल
आरोग्य आणि शिक्षण हेच कुठल्याही देशासाठी प्राधान्यक्रम असतो. पण भारतात मात्र या क्षेत्राकडेच दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळेच जीडीपीच्या 1.5 टक्के आरोग्यावर तर 1 टक्के शिक्षणावर खर्च होतो. याचाच परिणाम म्हणून भारतात आरोग्य व्यवस्था कमकुवत दिसते. त्यातही सरकारी आरोग्य व्यवस्था अधिक कमकुवत आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर स्वातंत्र्यानंतर केवळ 9 मेडिकल कॉलेज उभारली गेली. तर नव्या 6 सिटी हॉस्पिटलवरच आपण थांबलो आहोत. मुंबईत पालिकेने एवढ्या वर्षात केवळ दोनच रुग्णालये बांधली. त्यातच देशात डॉक्टरांची मोठी कमतरता असून कॊरोनामध्ये ही बाबही अधोरेखित झाली आहे, असे मत डॉ. विजय सुरासे यांनी व्यक्त केले.