मुंबई -महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला सध्या केंद्रीय तपास यंत्रणांची डोकेदुखी सतावत आहे. मोदी व केंद्र सरकार महाविकास आघाडीतील नेत्यांना टार्गेट करत आहे, असा आरोप लावला जात आहे. दरम्यान, आरोप झालेले हे नेते केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य का करत नाहीत? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
दुसऱ्यांदा ईडी'ने समन्स बजावून चौकशीला गैरहजर
शिवसेना खासदार भावना गवळी या आज दुसऱ्यांदा ईडी चौकशीला सामोरे गेल्या नाहीत. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप व शेल कंपन्याद्वारे कोट्यावधीच्या देणग्या कंपनीच्या खात्यावर वर्ग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या अगोदर भावना गवळी यांना चार ऑक्टोबरला ईडी चौकशीला हजार राहण्यासाठी समन्स बजावले होते. परंतु, त्यांनी पंधरा दिवसांची मुदत मागितल्याने 20 तारखेला त्यांना दुसऱ्यांदा ईडी'ने समन्स बजावून चौकशीला हजर राहायला सांगितले होते. परंतु, गवळी यांना चिकनगुनिया झाला असल्याने त्या चौकशीला हजर होऊ शकत नाहीत म्हणून त्यांना अजून पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात यावी अशी माहिती त्यांचे वकील इन्द्रपाल सिंग यांनी ईडीला दिली आहे.