मुंबई- राज्यात फडणवीस सरकार घालवायचे असेल तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेतले पाहिजे. अशी भूमिका आज आघाडीतील मित्र पक्षांकडून जाहीर करण्यात आली. मुंबईतील शेकाप कार्यालयात झालेल्या बैठकीत आघाडीसोबत येत असलेल्या मित्र पक्षांनी ही भूमिका जाहीर केली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाचा तिढा काही जागांचा अपवाद सोडल्यास सुटल्यात जमा आहे. मित्र पक्षांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणुकीत कोणत्या विषयांवर जनतेपुढे जायचे यावर आज बैठक घेतली होती. यावेळी शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह सीपीआयचे प्रकाश रेड्डी, अशोक ढवळे, माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे- पाटील आदी नेते उपस्थित होते. आमच्याकडुन जागावाटपाच्या निर्णयाबाबतची सर्व मित्र पक्षांची बैठक 17 तारखेला होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले.