मुंबई : राज्याला कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. खास करून दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले. आता दुसरी लाट जवळपास ओसरली असली तरीही, राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची(Third Wave of Corona) शक्यता नाकारता येत नाही. मात्र ही लाट अगदी सौम्य प्रमाणात असेल असे एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर गुलेरिया आणि वेलोरा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर जेकब जॉन यांनी सांगितल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी दिली आहे.
डिसेंबरच्या अखेरिस तिसरी लाट?
जवळपास डिसेंबर महिन्याच्या अखेर तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याचे यावेळी टोपे यावेळी म्हणाले. त्यामुळे राज्यातील जनतेने गाफील राहू नये. राज्य सरकारने कोरोना संबंधी जे काही नियम अद्यापही लागू केले आहेत ते तंतोतंत पाळावे असे आवाहन राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जनतेला केले आहे.
राज्यात डेल्टानंतर नवा विषाणू नाही
राज्यात डेल्टा व्हेरिएन्ट नंतर कोणताही नवीन विषाणू आढळलेला नाही. याबाबत कोणतीही नोंद अद्याप करण्यात आलेली नाही अशी माहितीही टोपे यांनी दिली आहे. तसेच डेल्टा व्हेरिएन्टवर लसीकरण प्रभावी असून राज्यात सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत राज्य सरकारने जवळपास अकरा कोटी डोस नागरिकांना दिले आहेत. यापैकी 80 टक्के लोकांना पहिला डोस तर 40 टक्के लोकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. तसेच राज्यात मुबलक लसींचा साठा आहे, असेही टोपे म्हणाले.
राज्यात दहा कोटी लोकांचे लसीकरण, आरोग्य मंत्र्यांची माहिती
राज्याने 9 नोव्हेंबर रोजी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचा दहा कोटीचा टप्पा पार केला. दुपारी चार वाजता राज्यात दहा कोटी लसींच्या मात्रा देण्याचा टप्पा गाठण्यात आरोग्य विभागाला यश आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात लसीची पहिली मात्रा ६ कोटी ८० लाख ५३ हजार ७७ तर दुसरी मात्रा ३ कोटील २० लाख ७४ हजार ५०४ देण्यात आल्या आहेत. एकूण १० कोटी १ लाख २७ हजार ५८१ लसीची मात्रा देण्यात आल्या आहेत.
लहान मुलांना लस व ज्येष्ठांना बूस्टर डोससाठी केंद्राकडे मागणी - राजेश टोपे
लहान मुलांच्या लसीकरणासह(Covid Vaccination) ज्येष्ठांना बूस्टर डोस(Booster Dose) देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे(Rajesh Tope) यांनी सोमवारी जालन्यात बोलताना दिली. शाळा सुरू झाल्याने 11 ते 20 वर्षे वयोगटातील मुलांचा एकमेकांशी संपर्क वाढल्याने या वयोगटातील कोरोना रुग्ण वाढल्याचे दिसत आहे. या मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचंही मत आहे असे टोपे म्हणाले. मुलांना लसीकरण आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दिवाळीनंतर दुसऱ्या सत्रात शाळेचे सर्वच वर्ग भरवण्याची मागणी पालकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे 5 वी पासून पुढील वर्ग आधीच उघडले असून 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं असून याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही टोपे म्हणाले.