महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मी मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो- मुख्यमंत्री

एसएनसी समुह विद्यापीठाचे उद्घाटन राज्यपालांच्या आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते झाले.या समारंभात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची जुगलबंदी रंगली.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : Jun 11, 2020, 4:38 PM IST

मुंबई- विद्यापीठांच्या परीक्षा व्हाव्यात की नाही या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि राजभवनमध्ये वादविवाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आज एचएसएनसी समुह विद्यापीठाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. मी सुद्धा कला शाखेचा विद्यार्थी आहे. मी मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो. मला अजूनही शिक्षण घेण्यास आवडेल, असेही मुख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री राज्यपाल यांची जुगलबंदी रंगली.

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या मदतीने कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण कसे सुरु राहील याकडे लक्ष द्यावे. विविध माध्यमांचा उपयोग करुन परीक्षा कधी सुरु होणार यापेक्षा शिक्षण कसे सुरु राहील याकडे सर्वानी अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणानंतर आनंद मिळतोच पण ते शिक्षण घेताना अधिक आनंदी राहून ते कसे यशस्वी होतील याकडे महाविद्यालयांनी लक्ष द्यावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. एक प्रकारे राज्यपालांना अप्रत्यक्षपणे हा टोला मानला जात आहे.

कोरोना विषाणू प्रादुर्भाव संदर्भात आढावा बैठकीला मुख्यमंत्र्यांनी दांडी मारून मुख्य सचिवांना पाठवले होते. त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करत कायद्यानुसार परीक्षा घेण्याचा आग्रह धरला होता. एकंदरीतच परीक्षांवरून वरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी भाजपमध्ये वाद सुरू असताना मुख्यमंत्र्यांचे विधान महत्त्वाचे ठरले आहे.

शिक्षण हे जीवनावश्यक असल्याने चौकटबद्ध शिक्षणापेक्षा आनंदाने जगण्याची कला शिकविणारे शिक्षण असले पाहिजे. या समुह विद्यापीठामुळे शैक्षणिक दर्जा उंचावण्याबरोबरच नव नवीन अभ्यासक्रमाचे स्वातंत्र्य मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा कला, संगीत, आरोग्य, कृषी, क्रीडा आशा विविघ विषयात कोणत्याही वयात शिक्षण घेता येईल आणि विद्यार्थी आपली कला जोपासतील, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

जागतिकीकरणामध्ये शिक्षण क्षेत्रात बदल होत आहेत. मात्र, शिक्षणाची भूक मात्र तीच कायम आहे. त्यासाठी दर्जेदार गुणवत्तापूर्ण सहज सोपे विद्यार्थ्यांना आनंद देणारे शिक्षण दिले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरु झाले आहे. याचा फायदा आपत्कालीन परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना होत आहे. या विद्यापीठामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही वयात शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करता येतील, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबर कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. यापूर्वी संशोधनाकडे विद्यार्थ्यांचे अधिक लक्ष होते. जागतिकीकरणामुळे संशोधनाबरोबरच कौशल्य आधारित शिक्षणाची गरज आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाच्या (रुसा) माध्यमातून विविध महाविद्यालयांनी एकत्र येऊन समुह विद्यापीठ स्थापन करावेत. त्यामुळे नवनवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकता येतील. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन एक मिशन म्हणून पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एचएसएनसी समुह विद्यापीठांच्या उद्‌घाटन प्रसंगी केले.

महानगराबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समुह विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा कौशल्य विकास आधारीत शिक्षण घेता येईल. शिक्षण क्षेत्रात गुणवत्तेबरोबरच दर्जेदार शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहेत, असे उदय सामंत म्हणाले.व्हर्टिकल युनिव्हर्सिटीसाठीसुद्धा शासनाने समिती गठित केली आहे, असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, एचएसएनसी समुह विद्यापीठाचे प्रमुख निरंजन हिरानंदनी, महाविद्यालयांचे प्राध्यापक सहभागी होते.

ABOUT THE AUTHOR

...view details