मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. आणि बाहेर पडून मुख्यमंत्री पद मिळवले. त्यावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी जर मुख्यमंत्रीपद त्यांना हवे होते हे आधीच सांगितले असते तर, त्यांना नक्कीच मुख्यमंत्री केले असते. असे सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
राहुल नार्वेकर यांना अभिनंदन - विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विजयी उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar new assembly speaker) यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन ठराव मांडाताना नार्वेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा त्यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मांडत त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर टोलेबाजी करत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.
आधी सांगितले असते तर मुख्यमंत्री केले असते - राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून मुख्यमंत्री पद मिळवले आहे. मात्र, एवढे करण्यापेक्षा त्यांनी जर आधी सांगितले असते तर त्यांना आम्ही नक्की मुख्यमंत्री केले असते असे सांगत आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी सभागृहातच विचारले. काय आदित्य आपण केले असते का मुख्यमंत्री? यावर आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी हसत होकारार्थी मान हलवून संमती दर्शवली. त्याशिवाय, सुधीर मुनगंटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांच्यावरही अजित पवार यांनी फिरकी घेतली. सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा अध्यक्ष करा असे मी सुचवले होते त्यांना जे काही बडबड करायची आहे ती त्यांनी वर बसून केली असती असेही अजित पवार गमतीत म्हटले.