मुंबई - महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात सातत्याने कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे. ही चिंतेची बाब असून, रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही तर, लोकल ट्रेनचे शेड्युल कमी करावे लागेल, असे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. यासोबतच सध्या लॉकडऊन करण्याचा कोणताही विचार नाही, हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच सिनेमागृहे, मंगल कार्यालय यांच्यावर देखील बंदी घालावी लागेल, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला.
हेही वाचा -अवनी वाघिणीच्या शिकारीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, वनअधिकाऱ्यांना दिलासा
केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. 60 ते 70 टक्के रुग्ण या दोन राज्यातूनच आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हे दोन राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
कोरोना नियमांचे पालन करा -
यवतमाळ, अमरावती, अकोला या तीन जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणे वाढत चालला आहे. तसेच राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. त्यामुळे खुद्द मुख्यमंत्री आठ दिवस वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. जर रुग्ण संख्या कमी झाली नाही तर, कडक निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखले पाहिजे. जेणेकरून वाढणारी रुग्ण संख्या ही आटोक्यात येऊ शकेल.