मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेस (आयडॉल) नुकतीच विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता दिली आहे. शुक्रवारपासून आयडॉलमध्ये 15 अभ्यासक्रमांच्या प्रवेशास प्रारंभ करण्यात आला आहे.
आयडॉलच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात, 26 ऑगस्ट प्रवेशाची अंतिम तारीख - युजीसी
युजीसीने आयडॉलला 31 जुलै 2019 रोजी मान्यता दिल्याने 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 40 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी आयडॉलमध्ये 67 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.
युजीसीने आयडॉलला 31 जुलै 2019 रोजी मान्यता दिल्याने 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी 40 हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. गतवर्षी आयडॉलमध्ये 67 हजार 500 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. आयडॉलने 10 जुलैपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठीची लिंक सुरू केली होती. आज सायंकाळपर्यंत 23 हजार 984 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आजपासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश व शुल्क भरण्याची लिंक सुरू झाली आहे. तृतीय वर्ष बीए, बीकॉम, पीजीडीएफएम व पीजीडिओआरएम या अभ्यासक्रमांचे प्रवेश 10 जुलैपासून सुरू करण्यात आले होते.
युजीसीच्या 2017 च्या नियमानुसार जुलैच्या शैक्षणिक सत्रासाठीचे प्रवेश ऑगस्ट अखेरपर्यंत करणे आवश्यक आहे. त्यामुळे आयडॉलने आजपासून प्रवेशप्रक्रिया सुरू केली आहे. हे प्रवेश विलंब शुल्काशिवाय 20 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहेत. यानंतर विलंब शुल्कासह 21 ऑगस्ट ते 26 ऑगस्टपर्यंत प्रवेश करता येतील. युजीसीने प्रवेशाची कालमर्यादा ठेवल्याने विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश लवकरात लवकर करावेत, अशी सूचना आयडॉलच्या संचालिका डॉ.कविता लघाटे यांनी केली आहे.