मुंबई- मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांवर आयडीबीआय बँकेचे ( IDBI Bank ) 31 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी याप्रकरणी प्रथम कफ परेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याने शुक्रवारी (दि. 17 जून ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सराफ कंपनीने बँकेकडून कर्ज घेतले होते. पण, कर्ज कराराच्या अटी व शर्तीचे उल्लंघन करून इतर कारणांसाठी निधी वळवला आहे. आयडीबीआयचे व्यवस्थापक संजीव कुमार सतपाल यांच्या तक्रारीवरून ऑरो गोल्ड ज्वेलरी प्रायव्हेट लिमिटेड ( AGIL )चे संचालक दिवंगत अमृतलाल गुलाबचंद जैन, रितेश अमृतलाल जैन आणि कंपनीचे सीएफओ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर फौजदारी विश्वासघात, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रथम कफ परेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासासाठी हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग 2 कक्षाकडे वर्ग केला आहे. सध्या तक्रारदार बँकेकडून कागदपत्रे मागवली आहेत. त्याआधारे रक्कम कोठे वळवण्यात आली. याचा शोध घेण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.