मुंबई -अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने त्याचे रुपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे मुंबई, गोवा आणि दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान खात्याने वादळासंदर्भात यलो अलर्ट जाहीर केला आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. समुद्रकिनारी आणि समुद्र किनाऱ्या लगतच्या विभागात विशेष काळजी घेतली जात आहे. समुद्र किनारी लाईफगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलाला अलर्टवर ठेवण्यात आले आहे. तसेच महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या सर्व संबंधीत यंत्रणांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश यापूर्वीच दिले आहेत. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या नेतृत्वात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. १५ तारखेला या तौक्तेचक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला तर १६ व १७ मे रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला याचा फटका बसण्याची शक्यता आहे. ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने ''तौती' वादळाची तीव्रता अधिक वाढणार आहे. तौक्ते वादळ हे नाव म्यानमार या देशाने ठेवले आहे. शनिवारी, १५ मे रोजी कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व गोव्याला या वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर १६ व १७ मेला मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील काही भागात अति मुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, मुंबई ठाणे रायगड पालघर भागात ६० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, या भागांसाठी 'यलो अलर्ट' जारी केल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
महापालिका अलर्टवर
दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या आसपासच्या भागात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारपर्यंत लक्षद्वीपपर्यंत पोहचले. येत्या 24 तासांत त्याचे च्रकीवादळात रुपांतर होईल, अशी चेतावणी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या चेतावणीनुसार मुंबई महापालिकेने गिरगाव, दादर, जुहू, अकसा, मार्वे आदी समुद्रकिनारी ९३ लाईफगार्डची नियुक्ती केली आहे. या लाईफ गार्डसना दोरखंड, माईक, जेटस्की बोटी देण्यात आल्या आहेत. तसेच नरिमन पॉईंट, नाना चौक, दादर, अंधेरी, मालाड, बोरिवली या मुंबई अग्निशमन दलाच्या केंद्रांवर जवानांना दोरखंड, बोटीसह अलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोविड बाधित रुग्णांना अधिक प्रभावी औषधोपचार मिळावेत, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे विविध ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. या जंबो कोविड सेंटरच्या परिसरालगत असणा-या धोकादायक वृक्षांची छाटणी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे करण्यात आली आहे. यानुसार भायखळा व मुलुंड परिसरातील रिचर्डसन आणि क्रुडास, एन.एस.सी.आय. डोम, एम.एम.आर.डी.ए., बीकेसी जंबो, नेस्को जंबो कोविड सेंटर, दहिसर जकात नाका, कांदरपाडा, शीव, मालाड, कांजुरमार्ग इत्यादी ठिकाणी असणा-या जंबो कोविड केंद्रांलगतच्या ३८४ झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. तसेच मागील वर्षी रुखी वादळा दरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांना ऐनवेळी इतरत्र हलवावे लागले होते. यावेळी असा प्रसंग उद्भवू नये, म्हणून पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच वादळाच्या वेळी घराबाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
जंबो कोविड सेंटरमधील रुग्णांचे स्थलांतर
गेल्यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळाच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचा अनुभव लक्षात घेऊन तैती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा उपाय म्हणून, वांद्रे-कुर्ला संकुल व दहिसर येथील जंबो कोविड सेंटरमधील अतिदक्षता विभागातील रुग्णांसह ३९५ रुग्णांचे स्थानांतरण हे महापालिकेच्या व राज्य शासनाच्या रुग्णालयांमध्ये करण्यात येणार आहे. हे स्थानांतरण प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारितील सेव्हन हिल्स रुग्णालय, नेस्को जंबो कोविड सेंटर, लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय आणि राज्य शासनाच्या अखत्यारितील सेंट जॉर्ज रुग्णालय येथे करण्यात येणार आहे.
वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता
वेगाने वाहणारे वारे व पर्जन्यवृष्टी संभाव्यतेच्या पार्श्वभूमीवर वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन, रुग्णालय क्षेत्रातील जनित्र व इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणा-या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात आली आहे.