मुंबई -ग्रंथालय हे शिक्षणाचा मूळ गाभा समजले जाते. परंतु, पारंपरिक स्तरावर देशात अव्वल असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या कालिना संकुलातील जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्याची दुरवस्था ( Books in library of Mumbai University are in bad condition ) झाली आहे. इतकेच नव्हे तर, ग्रंथालयातील अनेक दुर्मिळ पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे यांना वाळवी लागल्याचा धक्कादायक प्रकार सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी समोर आणलेला आहे. यासोबतच थोरात यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना पत्र लिहून तात्काळ ग्रंथालायची दुर्दशा थांबविण्याची मागणी केली आहे.
माहिती देताना अॅड. वैभव थोरात आणि 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -Subhash Desai on Marathi Language Elite Status : 'अभिजात दर्जा मिळण्यास महाराष्ट्र पात्र'
काय आहे प्रकरण?
मुंबई विद्यापीठातील ग्रंथालय अत्यंत मोडकळीस आलेला आहे. मागील पाच वर्षांपासून ग्रंथालयातील अनेक पुस्तके, विविध संदर्भ ग्रंथ, जुनी वर्तमानपत्रे अत्यंत वाईट पद्धतीने ठेवण्यात आली आहेत. तर, बरेच पुस्तकांना वाळवी लागली आहे. विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये लाखो पुस्तके आणि संदर्भ ग्रंथ आहेत. ही पुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि प्रबंधाचा अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांनी आपले संशोधन पूर्ण केले आहे. विद्यापीठातील या ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर अनेक संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक यांच्याकडून करण्यात येतो. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथसंपदेची खाण असलेल्या या ग्रंथालयाची मागील अनेक वर्षांपासून दूरवस्था होत आहे. २०१९ मध्ये ही बाब सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात याच्याबरोबर विद्यापीठाशी संबंधित विविध घटकांनी निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सहा महिन्यांनी नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु, विद्यापीठाच्या संथ कारभारामुळे तीन वर्षे उलटली तरी, दुरुस्तीचे काम रखडले आहे.
मराठी विभाग बंद -
सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले की, विद्यापीठाकडे ५० वर्षांहून अधिक जुनी असलेली वर्तमानपत्रे आहेत. प्राथमिक स्रोत म्हणून विद्यार्थी संशोधनासाठी या वर्तमानपत्रांचा अभ्यास करतात. मात्र, वर्तमानपत्रे विद्यापीठाने पॅसेजमध्ये फेकून दिली आहे. विद्यार्थ्यांचे प्रबंध अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. मुंबई विद्यापीठ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे ग्रंथालय ग्रंथालयासारखे वाटत नसून एखाद्या हॉरर मूव्हीच्या सेट प्रमाणे दिसून येत आहे. आपण काही दिवसांतच मराठी भाषा दिवस अत्यंत उत्साहात साजरा करणार आहोत. परंतु, जवाहरलाल नेहरू ग्रंथालयामध्ये मराठी भाषा विभाग आहे. मागील पाच वर्षांपासून हा विभागसुद्धा बंद आहे. 2019 साली कुलगुरूंना पत्र लिहून ग्रंथालयाचे परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती. परंतु, दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे. ग्रंथालयात पुस्तके आहे त्या स्थितीत ठेवून दुरुस्ती काम सध्या चालू आहे. पुस्तकांवर वाळू, सिमेंट, रेती पडली आहे. काही पुस्तके तर पोत्यांमध्ये कोंबून ठेवलेली आहेत. त्यामुळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी लक्ष घालून जवाहरलाल नेहरू ग्रंथालयामधील पुस्तकांना आणि विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी थोरात यांनी केली.
हेही वाचा -Malik Vs Wankhede : कथित विधानांचा वापर करून खोटी अवमान याचिका दाखल केल्याचा नवाब मलिक यांचा दावा