मुंबई -कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका मंडळाच्या कॅब सेंटरमध्ये तपासण्याऐवजी शिक्षकांना ते घरी तपासण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयामुळे शिक्षक संभ्रमात सापडले आहेत. कोरोनामुळे राज्यात परिस्थिती बिघडत चालली असताना दुसरीकडे आता संचारबंदी सुरू आहे, अशात आम्ही हे पेपर घरी कसे घेऊन जायचे, असा सवाल शिक्षक संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
हेही वाचा...''गावाकडच्या लोकांनी कायदा हातात घेऊ नये, पोलिसांना त्यांचे काम करू द्या''
राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावीच्या परीक्षेला राज्यभरातून 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले आहेत. तर, 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली आहे. आता दहावीचा केवळ सामाजिक शास्त्र भाग-२ (भूगोल) या विषयाचा पेपर बाकी असून तो कोरोनामुळे पुढे ढकलला आहे. दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका मूल्यांकन व नियमन करण्यासाठी पूर्वी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांच्या नावाने उत्तरपत्रिकांचे पार्सल पाठवण्यात येत होते. हे काम परीक्षक व नियामक म्हणून नेमणूक केलेले हे काम घरी करत असत. या पद्धतीमध्ये गोपनीयता राखली जात नव्हती व गैरप्रकार होण्याची शक्यता विचारात घेता राज्य मंडळाने कॅप सेंटरवरच पेपर तपासणी गेल्या काही वर्षापासून सुरू केली आहे.