मुंबई: भारतरत्न गानसम्राज्ञी लता यांच्या चर्चित शिवाजी पार्कमधील स्मारकाच्या मुद्द्यावर राजकीय वाद सुरू झाला आहे. काही नेत्यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे, अशी मागणी केली आहे. तर काही नेत्यांनी या स्मारकाला विरोध दर्शविला आहे. यावर लतादीदींचे बंधू आणि सुप्रसिद्ध संगीतकार पंडित ह्रदयनाथ मंगेशकर (pandit hridaynath mangeshkar) यांनी आपले मत व्यक्त करत सर्व नेत्यांना स्मारकावरून होणारे राजकारण थांबवण्याची विनंती केली आहे. शिवाजी पार्कवर लतादीदींचे स्मारक व्हावे, अशी आमची इच्छा नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी एका वृत्तवाहिनीला आपली प्रतिक्रिया दिली.
...हीच खरी श्रद्धांजली
पंडित हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, दीदींच्या स्मारकावरून जो वाद सुरू आहे. तो राजकारण्यांनी थांबावावा. दीदींच्या बाबतीत कोणतेही राजकारण करू नये. आंतरराष्ट्रीय संगीत विद्यापीठाची स्थापना हीच लतादीदींना खरी श्रद्धांजली आहे. महाराष्ट्र शासनाने लता मंगेशकर संगीत विद्यालय स्थापन करण्याचे आश्वासन लता दीदींना दिले होते. यासंदर्भात स्वत: लतादीदींनी सरकारकडे विनंती केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उदय सामंत, आदित्य ठाकरे यांनी ही विनंती मान्य करून त्यासंदर्भात पूर्वतयारी केलेली आहे. दीदींचे संगीत स्मारक तयार होत आहेत, यापेक्षा अन्य कोणतेही मोठे स्मारक होऊ शकत नाही.
'राजकारण थांबवावे'
शिवाजी पार्कात दीदींचे स्मारक होण्याऐवजी उलट आमचे असे म्हणणे आहे की, शिवाजी पार्कातील स्मारकावरून जो राजकीय लोकांचा वाद सुरू झाला आहे तो वाद त्यांनी बंद करावा आणि दीदींच्याबाबत कृपया राजकारण करू नये, अशी विनंती त्यांनी केली आहे.