मुंबई - राज ठाकरे ( Raj Thackreay ) आज त्यांचा वाढदिवस आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackreay ) यांचे ते सर्वात प्रिय होते. आजही अनेक लोक राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांचे रुप पाहतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे दोघे चुलत बंधू. मात्र, उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर दुसरा भाऊ म्हणजेच राज ठाकरे अतित्वाची लढाई लढत आहेत.
राज ठाकरेहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चुलत भाऊ आहेत. राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू श्रीकांत ठाकरे यांचे ते पुत्र. बाळ ठाकरे यांच्या पत्नी मीना ठाकरे यांच्या बहिणीचा विवाह त्यांचा धाकटा भाऊ श्रीकांत याच्याशी झाला होता. राज ठाकरे यांचे खरे नाव स्वराज श्रीकांत ठाकरे. बाळ ठाकरे यांच्या सांगण्यावरून त्यांनी नाव बदलले. त्यानंतर ते राज ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले. राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे. राज ठाकरे हे शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे सर्वात प्रिय होते. आज अनेक लोक राज ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरे यांची सावली पाहतात. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैचारिक विरोध काळानुसार वाढतच जात आहेत. एक भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आणि दुसरा भाऊ अतित्वाची लढाई लढत आहे. १४ जून १९६८ रोजी जन्मलेल्या राज ठाकरे यांनी बाल मोहन विद्यामंदिर, मुंबई येथून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध जॅझ स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी पदवी घेतली. मात्र, त्यांनी काका बाळ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात राजकारण धडे गिरविले. 1996 मध्ये राज ठाकरे यांनी एक लोकप्रिय संगीत महोत्सव आयोजित केला होता, ज्यामध्ये लोकप्रिय पॉप स्टार मायकल जॅक्सन आणि लोकप्रिय गायिका लता मंगेशकर उपस्थित होते.
कलाकार राज ठाकरे -राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे संगीत दिग्दर्शक होते. त्यांच्या पत्नीचे नाव मधुवंती आणि मुलाचे नाव स्वराज. मधुवंती हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा राग आहे. स्वराज म्हणजे आवाजांचा राजा. त्यांनी आपल्या मुलीचे नाव जयजयवंती ठेवले. लहानपणी स्वराज यांनी तबला, गिटार आणि व्हायोलिन शिकायला सुरुवात केली. त्यांना संगीताची आवड होती. व्यंगचित्र काढायला जास्त आवडते.
युवा सेनेची जबाबदारी -राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेत असताना युवासेनेचे जबाबदारी देण्यात आली होती. युवा सेनेचे अध्यक्ष असताना शिवसेनेला तरुणांशी जोडण्याचे महत्त्वाचे काम राज ठाकरे यांनी पार पाडले होते. युवा सेनेच्या माध्यमातून महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणांना शिवसेनेशी जोडण्याचे काम राज ठाकरे यांनी केले. या काळात राज ठाकरे युवकांमध्ये कमालीचे लोकप्रिय होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना -उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या टोकाच्या वैचारिक मतभेदातून शिवसेनेतून बाहेर पडून राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. या पक्षाच्या स्थापनेनंतर आपल्या स्वतंत्र राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत राज ठाकरे यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पक्षाला सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला. 2009 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले उमेदवार पहिल्यांदाच उभे केले होते. तरीही राज्यातील जनतेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 13 उमेदवारांना आमदार म्हणून पसंती दिली होती. नाशिक महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता आली होती. मुंबई पुणेसारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बर्यापैकी यश मिळाले होते. मात्र, हे यश जास्त काळ टिकू शकले नाही. त्यानंतर मनसेचा आलेख हा उतरता राहिला आहे. आताची जर राजकीय परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रात एकच आमदार राज ठाकरे यांच्या पक्षाचा आहे.
राज ठाकरे आणि वाद -राज ठाकरे आणि वाद हे समीकरणच महाराष्ट्रात तयार झाले आहे.2008 साली झालेल्या रेल्वे भरतीत महाराष्ट्रात आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला होता. महाराष्ट्रात रेल्वेची भरती होणार असेल तर महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. यावेळी महाराष्ट्रभरात परीक्षा केंद्रांवर मनसे कार्यकर्ते शिरून उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करत होते. या प्रकरणात राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात राज ठाकरे यांना अटक करावी, अशी मागणी जोर धरू लागल्यानंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना त्यांना अटक झाली होती. 21 ऑक्टोबर 2008 ला राज ठाकरे कोकण दौऱ्यावर असताना रत्नागिरीतून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून याचे पडसाद राज्यभर उमटले. याशिवाय अनेक आंदोलन प्रकरणी अनेक राज्यातल्या अनेक पोलिस ठाण्यांमध्ये त्यांच्या विरोधात अनेकदा तक्रारी दाखल झाल्या आहेत.
प्रक्षोभक भाषणे -राज ठाकरे हे नेहमीच प्रक्षोभक भाषण करत असल्याचा आरोप सातत्याने त्यांच्या विरोधकांकडून केला जातो. आताही राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत देखील त्यांच्या कार्यकर्त्यांवर राज्यभरात अनेक ठिकाणी गुन्हे नोंदविले गेेले आहेत.
हेही वाचा -Raj Thackeray poster torn : राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडले, मुंबऱ्यात तणाव