मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल ( Maharashtra Rajya Sabha Election 2022 ) जाहीर झाला आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आपला उमेदवार जिंकणारच असा दावा केला होता. त्यादृष्टीने त्यांनी व्युहरचनाही केली होती. मात्र निकालानंतर त्यांचे गणित फसल्याचे दिसून आले. संजय पवार यांचा पराभव झाला, तर धनंजय महाडिक निवडून आले.
विजयी उमेदवारांची माहिती -
कोण आहेत प्रफुल्ल पटेल, कसे जिंकले राज्यसभेची निवडणूक -प्रफुल्ल पटेल हे काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात पंधराव्या लोकसभेच्या मंत्रिमंडळात नागरी विमान वाहतूक मंत्रालयात मंत्री होते. त्यांचे वडील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. त्यांनी गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. पटेल यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ कॉमर्स पदवी मिळवली आणि गुजराती व्यावसायिकाची मुलगी वर्षा पटेल यांच्याशी लग्न केले. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. मतमोजणीत त्यांना ४३ मते पडली आहेत. राष्ट्रवादीची पहिल्या पसंतीची ४३ मते मिळवून प्रफुल पटेल यांचा विजय झाला. शरद पवारांचे विश्वासू म्हणून ते ओळखले जातात.
कोण आहेत इम्रान प्रतापगढी, कसे जिंकले राज्यसभेची निवडणूक -यूपीच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रहिवासी असलेले मोहम्मद इम्रान प्रतापगढ़ी यांना काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. इम्रान प्रतापगढ़ी हे उत्तरप्रदेशच्या जेठवा कोतवालीच्या भागीपूर गावचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1987 रोजी झाला. त्याचे वडील व्यवसायाने डॉक्टर आहेत. इम्रान हा आपल्या कवितांनी लोकांची मने जिंकणारा कवी आहे. त्यांचे मुशायरे ऐकण्यासाठी दुरून लोक येतात. इम्रानला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. 2018 मध्ये इम्रान गांधी कुटुंबाशी जवळीक वाढली आणि त्यानंतर इम्रानने काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2019 मध्ये काँग्रेस पक्षानेही त्यांना मुरादाबादमधून लोकसभेचे तिकीट देऊन निवडणूक लढवली, परंतु इम्रान निवडणूक जिंकू शकले नाहीत. यंदा काँग्रेसने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेची उमेदवारी दिली होती. काँग्रेसने त्यांना त्यांच्या ४२ च्या कोट्यापेक्षा २ मते जास्त इम्रान प्रतापगढी यांना दिल्याने ते विजयी झाले.
कोण आहेत पियुष गोयल, कसे जिंकले राज्यसभेची निवडणूक - पियुष वेदप्रकाश गोयल हे भारतीय जनता पक्षाने नेते आणि देशाचे कॅबिनेट मंत्री आहेत. ज्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री अशी खात्यांची जबाबदारी आहे. 3 सप्टेंबर 2017 रोजी त्यांची कॅबिनेट मंत्री पदावर निवड झाली. यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय कोषाध्यक्षपद भूषवले होते. त्यांनी भाजपच्या माहिती संप्रेषण अभियान समितीचे नेतृत्व केले. जेथे त्यांनी भारतीय सार्वत्रिक निवडणुका 2014 साठी सोशल मीडिया पोहोचण्यासह पक्षाच्या प्रचार आणि जाहिरात मोहिमेचे निरीक्षण केले. गोयल यांनी 2018 आणि 2019 मध्ये दोनदा वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रीपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे. यापूर्वी ते ऊर्जा, कोळसा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा, आणि खाण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) होते. यापूर्वीही ते महाराष्ट्रातून भाजपतर्फे राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यंदाही भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. भाजपकडे गोयल यांच्या विजयासाठी आवश्यक मते असल्याने ४८ मतांसह गोयल यंदा विजयी झाले.
कोण आहेत अनिल बोंडे, कसे जिंकले राज्यसभेची निवडणूक -डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते 13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत. त्यांनी मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. बोंडे हे 2009 ते 2014 मध्ये अपक्ष आमदार होते. यंदा त्यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली होती. यंदाच्या निवडणुकीत बोंडे यांना विजय काही अवघड नव्हता. भाजपने त्यांच्या पारड्यात पहिल्या पसंतीची ४८ मते टाकल्याने बोंडे विजयी झाले.
कोण आहेत संजय राऊत, कसे जिंकले राज्यसभेची निवडणूक -संजय राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी अलिबागमध्ये झाला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केलेले संजय राऊत हे शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. ते शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. संजय राऊत यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या पुरवठा विभागात काम करण्यापासून झाली. पुढे त्यांनी मार्केटिंग विभागात काम केले. त्यानंतर राऊत ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात क्राईम रिपोर्टर म्हणून राऊत यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. अनेक सनसनाटी बातम्यांचे वृत्तांकन केल्याने संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेत भरले. संजय राऊत यांची भूमिका शिवसेनेशी मिळतीजुळती असल्याचे बाळासाहेबांना वाटायचे. त्यामुळे दैनिक सामना सुरु झाल्यानंतर बाळासाहेबांनी संजय राऊत यांना 1993 ला कार्यकारी संपादक पदावर रुजू केले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून संजय राऊत शिवसेनेत आहेत. सध्याच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. यंदा शिवसेनेने पुन्हा एकदा संजय राऊत यांना राज्यसभेची उमेदवारी दिली. या निवडणुकीत शिवसेनेकडे संजय राऊत यांच्यासाठी अपेक्षित मतदान असल्याने त्यांना निवडून जाण्यासाठी अडथळा नव्हता. त्यामुळे शिवसेनेच्या ४२ आमदारांनी पहिल्या पसंतीचे मत राऊत यांना टाकले आणि ते विजयी झाले.