मुंबई - दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्यात, या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन ( Student Agitations ) केले. या प्रकरणाची चौकशीचे आदेश पोलिसांना दिले असून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी दिली आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन ( Student Agitations ) हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी, अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले. पोलीस विभागाला याविषयी आदेश देण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.