मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरणातील आरोपी व ज्येष्ठ विचारवंत गौतम नवलखा यांना जेल प्रशासनाकडून चष्मा देण्यात आला नाही याची सविस्तर चौकशी केली जाईल व दोषींना यासंदर्भात कारवाईला सामोरे जावे लागेल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
न्यायालयाची नाराजी
मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत गौतम नवलखा यांचा चष्मा चोरीला गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून त्यांना चष्मा कुरियरच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता. मात्र तळोजा कारागृह प्रशासनाकडून हा चष्मा नवलखा यांना देण्यात आलेला नव्हता. चष्म्याशिवाय त्यांना काही पाहता येणे शक्य नसल्यामुळे माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना चष्मा देण्यात यायला हवा होता, असे म्हणत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती एस. एम. कर्णिक यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चौकशी चौकशीचे आदेश दिले आहेत.
नियमासोबतच माणूसकीही महत्त्वाची
कोणत्याही कैद्याला कुरीअरद्वारे आलेल्या वस्तू देता येत नाहीत. मात्र जर कुटुंबीयांनी जर स्वत: जेलमध्ये येऊन एखादी वस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली, तर विचार करता येऊ शकतो, असे स्पष्टीकरण कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून उच्च न्यायालयात देण्यात आले होते. मात्र, यावर नियम पाळणे जितके महत्त्वाचे आहे, तशी माणूसकी जपणेही सर्वात महत्त्वाचे आहे. इथे तिच कशी विसरली जाते, व्यक्तीच्या दैनंदिन वापरातील लहान-सहान वस्तू कशा काय नाकारता येवू शकतात, असे खडेबोल उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने तळोजा कारागृह प्रशासनाला सुनावले.