मुंबई -माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Param Bir Singh, former Police Commissioner of Mumbai) आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या भेटीबाबत मुंबई पोलिसां(Mumbai Police)ना चौकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली आहे. पत्रकारांशी ते बोलत होते.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चांदिवाल आयोगासमोर चर्चा
ते म्हणाले, की परम बीर सिंग आणि सचिन वाझे यांची भेट झाली. यासंदर्भात चौकशी करणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच माहिती दिली जाईल. न्यायालयीन कोठडीत असताना बाहेरच्या व्यक्तींना भेटणे चुकीचे आहे. त्याचबरोबर कर्तव्यावर नसताना सरकारी वाहन वापरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. परम बीर यांच्या प्रकरणात काल चांदिवाल आयोगा(Chandiwal Aayog)समोर तासभर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दोघांमध्ये तासभर चर्चा
सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी केबिनमध्ये बसून सुमारे तासभर चर्चा केल्याचे वृत्त समोर आले. यानंतर आता मुंबई पोलीस या भेटीचा तपास करणार आहेत. या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या इमारतीत पोहोचले. अशा प्रकारे दोघांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमके काय झाले, याचा तपास पोलीस करत आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackreay) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुखांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचं वसुलीचं टार्गेट दिले होते, असा खळबळजनक आरोप परम बीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केला होता. यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरही या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही याचप्रकरणात गेल्या दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या कोठडीत आहे.
परमबीर सिंग यांची सीआयडीकडून सलग 5 तास चौकशी
नवी मुंबईतील बेलापूरमधील सीआयडी (CID) कार्यालयात परमबीर सिंगांची (Param Bir Singh) सुमारे पाच तास चौकशी करण्यात आली. खंडणी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान परमबीर सिंग यांच्यावर सीआयडीकडून प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईतील मरिन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात सिंग यांची नवी मुंबईतील बेलापूर येथील कोकणभवन मध्ये सीआयडीच्या माध्यमातून सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे 5 तासांसाठी चौकशी करण्यात आली. सीआयडीचे पोलीस अधीक्षक एम. एन. जगताप आणि सीआयडी प्रमुख रतेश कुमार यांनी सिंग यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे.