मुंबई -काल मुंबई सायबर सेल पोलिसांनी माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Leader of Opposition Devendra Fadnavis Interrogation ) यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी दोन तास कसून चौकशी केली. या चौकशीला भाजपकडून विरोध करण्यात येत होता व हा मुद्दा आज विधानसभेमध्ये गाजणार यामध्ये कुठलेही दुमत नव्हते. परंतु या मुद्द्यावर आज विधानसभेमध्ये भाजप नेते आक्रमक झाले असताना यास उत्तर देताना गृहमंत्री वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरोपी म्हणून नोटीस पाठवली नसून याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांची चौकशी केली गेली, असे सांगून या वादावर पडदा ( Home Minister About Fadnavis Interrogation ) टाकला आहे.
काय म्हणाले गृहमंत्री -
या प्रकरणावर बोलताना गृहमंत्री म्हणाले, की या प्रकरणांमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. २४ लोकांचे जबाब घेतले गेले आहेत. सीआरपीसी ॲक्ट 160 प्रमाणे तपास अधिकाऱ्यांना कुठली माहिती हवी असल्यास ते मागू शकतात. देवेंद्र फडवणीस यांना या अगोदरही नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. पण ते कामांमध्ये कदाचित व्यस्त असल्याकारणाने त्याला उत्तर देऊ शकले नाहीत. याबाबत त्यांना कुठले प्रश्न विचारण्यात आले व त्यांनी काय उत्तर दिली हे मला माहीत नाही. परंतु चौकशी याबाबत चालू आहे की गुप्तचर विभागाचा डेटा बाहेर कसा आला. केंद्रीय गृह सचिव यांना पत्र पाठवून तो पेन ड्राईव्ह पोलिसांनी मागवला आहे. आपल्याकडे काय माहिती आहे हेच त्यांना विचारण्यात आले होते. हा रुटीन चा भाग असून देवेंद्र फडवणीस हे आरोपी म्हणून त्यांना नोटीस पाठवली नाही. जाणीपूर्वक त्यांना अडचणीत आणण्याचा शासनाचा कुठलाही मानस नाही आहे. त्या कारणास्तव हा विषय इथेच थांबवावा अशी विनंतीही त्यांनी सभागृहातील भाजप नेत्यांना केली.