मुंबई -दिल्ली पोलिसांनी काल सहा दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या. यातील जान मोहम्मदला मुंबईहून रेल्वेचे तिकीट काढून देणाऱ्या ट्रॅव्हल एजंटला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यानुसार मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रँचने अजगर नावाच्या एका ट्रॅव्हल एजंटला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. दहशतवाद्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्र एटीएस प्रमुख विनित अग्रवाल, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि अन्य उच्च अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ट्रेनची केली होती बुकिंग -
पोलिसांना चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, जान मोहम्मद शेख हा सोमवारपर्यंत मुंबईत होता. त्याने आपण उत्तर प्रदेशला जात असल्याचे पत्नीला सांगितले होते. त्याची ई-तिकीट देखील पत्नीला मोबाईलमध्ये दाखवली होती. अजगरने १३ सप्टेंबरला मुंबई सेंट्रल ते दिल्ली ट्रेनची बुकिंग केली होती. अजगर हा दिल्लीत जान राहत असलेल्या भागातच राहत होता. तसेच अजगर हा स्नॅपडील कंपनीत काम करत असल्याचे त्याच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.
दोन हवाला ऑपरेटर एजन्सी पोलिसांच्या रडारवर -
दहशतवाद्यांना रेल्वेची तिकीट काढून देणाऱ्या ट्रॅव्हल्स एजन्सीज मुंबई पोलिसांच्या रडावर आहेत. यामध्ये दोन हवाला ऑपरेटर एजन्सीचा समावेश आहे. या दोन्ही एजन्सी लॉजिस्टिक सपोर्टचा वापर रिकरूटमेंट प्रोसेससाठी करत होते, असा आरोप आहे.