मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणात दिलेला निकाल आणि त्याचे आम्ही स्वागतच करतो, मात्र मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कुठेही कुचराई केली नाही. त्यांचे काम अत्यंत चांगले राहिले असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. परंतु विरोधकांकडून यासाठी राजकारण केले जात असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
अनिल देशमुखांची प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाने आज सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निकाल दिल्यानंतर देशमुख यांनी दुपारी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. या निकालावर अभ्यास करूनच बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. काही वेळापूर्वी त्यांनी आपल्या मंत्रालयातील दालनात अनेक कायदे तज्ञ आणि पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन याविषयीचे मत जाणून घेतले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
हेही वाचा -महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करावे व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; भाजपाची मागणी
कायदेविषयक सल्लागार आणि तज्ञांशी चर्चा केल्यानंतर देशमुख यांनी भारतीय संविधानाने आपल्याला संघराज्य म्हणून काही अधिकार दिलेले आहेत, त्यावर नव्याने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आपली नाराजी व्यक्त केली. सुशांतसिंह प्रकरणात सरकारकडून न्यायालयात अपील केली जाईल का? यासंदर्भात विचारले असता त्यावर त्यांनी बोलण्याचे टाळले. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली आहे, त्याचा दाखलाच न्यायालयाने दिला असून तेव्हा आपण समाधानी असल्याचे ते म्हणाले.
सुशांतसिंह प्रकरणी विरोधकांकडून आज करण्यात आलेल्या दाव्याची दखल घेत देशमुख म्हणाले, काही मंडळी मुंबई पोलिसांच्या तपासात दोष आहे, असे म्हणत होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली आहे. बिहारमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका येत असून त्याच पार्श्वभूमीवर सुशांतसिंह प्रकरणात विरोधकांकडून राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा -मुंबई पोलिसांसारखी सीबीआयवर सुद्धा होऊ शकते राजकीय टीका- अॅड. उज्ज्वल निकम