मुंबई -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन करून त्यांच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. तसेच नारायण राणे यांना केलेल्या अटकेचा पूर्ण तपशील अमित शाह यांनी मागवला आहे, अशी माहिती भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी दिली आहे.
हेही वाचा -शेतकर्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली गांजा लागवडीची परवानगी
- अमित शाह यांचा नारायण राणे यांना फोन -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा थांबवल्यामुळे भाजपच्या गोटामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. नारायण राणे यांच्या अटकेनंतर त्यांच्या मागे संपूर्ण भाजप उभा असल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यानंतर आज गृहमंत्री अमित शाह यांनी देखील नारायण राणे यांना फोन करून सर्व घटनेचा तपशील जाणून घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारकडून देखील या मुद्द्यात लक्ष घालण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर नाशिक, पुणे, महाड येथे नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. या सर्व घटनेवर आता केंद्र सरकार देखील लक्ष ठेवून आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्या मुद्द्यावर येणाऱ्या काळात केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असं चित्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -जुने व्हायरस पुन्हा आलेत, त्यांचा बंदोबस्त करावा लागेल - उद्धव ठाकरे