मुंबई -केंद्र सरकारने होम आयसोलेशनबाबत मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल ( Home Isolation New Guideline ) केला आहे. कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी नसलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवावे असे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. मुंबई महापालिकेकडून याची अंमलबजावणी करण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले आहे.
होम आयसोलेशन -
डिसेंबर पासून देशभरात कोरोना व ओमायक्रॉनच्या संख्येत वाढ झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी कमी प्रमाणात रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तसेच घरच्या घरीच चार ते पाच दिवसात रुग्ण उपचार घेऊन बरे होत आहेत. यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी रुग्णालयावर ताण येऊ नये म्हणून केंद्र सरकारने होम आयसोलेशनच्या नियमात बदल केले आहेत. मुंबईत रोज २० हजारावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची तर १ ते २ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये भरती करण्याची गरज भासत आहे. तसेच मुंबईतही रुग्ण ४ ते ५ दिवसात घरीच उपचार घेऊन बरे होत आहेत. यासाठी पालिकेने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे लक्षणे असूनही कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी नसलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आली आहे.
हे राहू शकतात गृह विलगिकरणात -
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णाला गृह विलगीकरणात राहता येणार आहे. त्यासाठी घरात विलगीकरणासाठी स्वतंत्र खोली असणे गरजेचे आहे. तसेच जेष्ठ नागरिक, दीर्घकालीन व्याधी असलेल्या रुग्णांना डॉक्टरमार्फत तपासणी केल्यानंतरच गृह विलगीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. एचआयव्ही बाधित, कर्करोगग्रस्तांना, प्रसुतीसाठी दोन आठवड्याचा कालावधी असलेल्या गर्भवती महिलांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.