मुंबई -कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे नागरिकांनी यंदा छठ पूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्याच्या गृहविभागाने केले आहे. तसेच या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्याचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.
मंगळवार पासूनच्या (9 नोव्हेंबर) सुर्यास्तापासून ते बुधवार (10 नोव्हेंबर) च्या सुर्योदयापर्यंत छठपूजा उत्सव साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळेगेल्या दीड वर्षापासून सर्व धर्मीय सण/उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने व लोकांनी एकत्रित न येता साजरे केले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. नागरिकांनी त्यामुळे मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करु नये. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना गृहविभागाने केल्या आहेत.
अशा असतील सूचना -
- “ब्रेक द चेन” अंतर्गत दिलेल्या सुधारीत मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
- सध्या राज्यातील धार्मिक स्थळे खुली केली आहेत. तरीही छठ पूजा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घ्या.
- नागरिकांनी नदी, तलाव अथवा समुद्राच्या काठी एकत्र येऊ नये. गर्दी टाळावी आणि घरीच थांबूनच साध्या पद्धतीने छठ पूजा साजरी करावी.
- ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडण्याचे शक्यतो टाळावे.
- महानगरपालिका/स्थानिक प्राधिकरण, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने छठपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करावी.
- कृत्रिम तलावांच्या ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने निर्जंतुकीकरण उपाययोजना कराव्यात.
- सुरक्षा व स्वच्छतेच्या उपाययोजना याबाबत जनजागृती करावी.
- छठ पूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही, याची काळजी घ्या.
- सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावयाचे झाल्यास या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी. शक्यतो कार्यक्रमांचे ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक इत्यादी माध्यमांद्वारे प्रसारण करण्यावर भर द्यावा.
- छठ पूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारु नयेत.
- स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार महापालिका, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला असतील.
- नियमांमध्ये परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सवाच्या दिवसाच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने बदल झाल्यास त्याचे अनुपालन करावे.
- शासन परिपत्रक शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध केले आहे.
छटपूजेसाठी महापालिकेकडून कृत्रिम तलावाची निर्मिती छटपूजेसाठी महापालिका करणार कृत्रिम तलावाची निर्मिती!
मुंबई तसेच उपनगरात राहणारे उत्तर भारतीय मोठ्या उत्साहात छटपूजा साजरी करत असतात. मात्र कोविडचा प्रादुर्भाव पाहता छटपूजा सार्वजनिक ठिकाणी साजरी करू नये असं परिपत्रक महानगरपालिकेकडून काढण्यात आले होत. तसेच छटपूजा साजरी करावयाची असल्यास नागरिकांनीच स्वखर्चाने कृत्रिम तलावाची निर्मिती करावी असे नियम महापालिकेकडून होते. मात्र महानगरपालिकेने 10 नोव्हेंबरला छटपूजा साजरी करण्यासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करून द्यावी या मागणीसाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि महानगरपालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. या भेटीनंतर महापालिकेकडून छटपूजा साजरी करण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्याचे आश्वासन अश्विनी भिडे यांच्याकडून देण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये ज्या ठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी हे कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. मात्र छटपूजा साजरी करत असताना कोविड चे सर्व नियम नागरिकांनी पाळावेत असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. तसेच छटपूजा साजरी करत असताना काँग्रेसकडून मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये कमीत कमी दहा लसीकरण केंद्र सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती यावेळी भाई जगताप यांनी दिली आहे.
शासन एक पाऊल पुढे आल्यास एसटी कर्मचाऱ्यांनी एक पाऊल मागे घ्यावे - एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाची मागणी 20 वर्ष जुनी आहे. मात्र सध्या एसटी कर्मचाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली असून, कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे आहे. विलीनीकरणामुळे कर्मचाऱ्यांना शासकीय फायदे लागू होतील. याबाबत आपण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी देखील बोललो असून याबाबतचा निर्णय लवकरच होईल, अशी शक्यता भाई जगताप यांनी देखील वर्तवली आहे. मात्र कर्मचाऱ्यांसाठी शासन एक पाऊल पुढे आल्यास कर्मचाऱ्यांनी देखील एक पाऊल मागे यावं, असा सल्ला भाई जगताप यांनी दिला आहे.