मुंबई -मुंबईतील प्रसिद्ध मंदिर म्हणून प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराची गणना होते. मुंबईतील हे सर्वात जुने मंदिर म्हणून ओळखले जाते. श्रीमंत मंदिरांपैकी सिद्धिविनायक हे एक मंदिर आहे. सिद्धिविनायक या मंदिरास एक छोटासा मंडप आहे. यावर पवित्र देवळातील लाकडी दारे अष्टविनायक यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. पवित्र अंतराच्या आतील छप्पर सोन्याने बांधलेला आहे आणि मध्य पुतळा गणपतीचा आहे. परिसरामध्ये एक हनुमान मंदिर आहे. या मंदिरात संकष्टी आणि गणेश चतुर्थीला मोठी गर्दी असते. गणेशोत्सव निमित्ताने जाणून घेऊया सिद्धिविनायक मंदिराचा इतिहास...
- सिद्धिविनायकाची मूर्ती -
प्रभादेवीचा सिद्धिविनायक म्हणजे मुंबई आणि मुंबईबाहेरीलही गणेश भक्तांचे अतिशय श्रद्धेचे स्थान. या मंदिरातील उजव्या सोंडेची मूर्ती चतुर्भुज असून वरच्या दोन हातात अंकुश व कमळ, खालच्या हातात जपमाळ व मोदक आहे. या मंदिरातील मूळ मूर्ती काळ्या दगडाची असून ती रंगवण्यात आली आहे. पूर्वी येथे पुरातन बांधणीचे मंदिर होते. आता मात्र आकर्षक इमारतीसारखे मंदिर उभारण्यात आले आहे.
19 नोव्हेंबर 1801 रोजी हे सिद्धिविनायक मंदिर बांधण्यात आले. मंदिराची मूळ रचना घुमटाकार आहे. मंदिराचे बांधकाम हे लक्ष्मण विठू पाटील यांनी केले होते. मंदिराच्या कॉम्पलेक्समध्ये दोन दिपमाळ, विश्रामगृहे व देखभालीसाठी राहण्याची व्यवस्था होती. परिसरात 30 x 40 चौरस मीटरचा तलाव होता. अठराशे शतकाच्या सुरुवातीला नारदुल्ला यांनी पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी हा तलाव बांधला होता. तलावाची जमीन आता मंदिर परिसराचा भाग नाही.
- सिद्धिविनायक नाव कसे पडले?
गणपतीच्या या रुपाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. उजव्या सोंडेच्या गणपतीच्या स्वरुपाला सिद्धपीठ असे संबोधले जाते. म्हणूनच गणपतीच्या या स्वरुपात स्थापित झालेल्या मंदिरांना सिद्धिविनायक मंदिर असे म्हटले जाते.
हेही वाचा -Ganeshotsav 2021 : जाणून घ्या, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास
सिद्धिविनायक मंदिराला गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळालेली आहे. मुंबई व आसपासच्या परिसरातील भक्त मोठ्या प्रमाणात या मंदिराला भेट देतात. विशेष म्हणजे, अंगारकी, संकष्टी, संकष्टी योग या दिवशी भाविकांची मोठ्या प्रमाणात मंदिरात गर्दी असते. सिद्धिविनायक गणपती हा नवसाला पावत असल्याची धारणा असल्याने अनेक भाविक मुंबईच्या सीमेपासून चालत मंदिरापर्यंत येतात. आपला नवस पूर्ण व्हावा, आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी ते चालत येत असतात. कुली चित्रपटादरम्यान जेव्हा सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली होती. त्यावेळेस त्यांनी या मंदिरामध्ये चालत येऊन नवस केला होता. त्या घटनेनंतर सिद्धिविनायक मंदिराला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली.
सिद्धिविनायक मंदिर हे मुंबई, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध आहे. सिद्धिविनायक ट्रस्टतर्फे दरवर्षी मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले जातात. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, गरीब यांना उपचारासाठी मंदिर ट्रस्टकडून आर्थिक मदत करण्यात येते. त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या कोविड काळामध्ये ट्रस्टमार्फत मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामुळे कोविड रुग्णांना आवश्यक असणारा रक्तसाठा पुरवण्यात रक्तपेढ्यांना यश आले. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदतही केली जाते. यामुळे या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत होते. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे डायलिसिस रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सेंटर चालवण्यात येते. यामुळे अनेक रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो. असे अऩेक समाजोपयोगी कार्यक्रम ट्रस्टकडून राबवण्यात येतात.
- ज्येष्ठ नागरिकांना फायदा -
अनेक ज्येष्ठ नागरिक याचा फायदा घेत असतात. त्याचप्रमाणे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची व्यवस्था केलेली आहे. या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. तसेच भविष्यामध्ये सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून मल्टी स्पेशलिस्ट रुग्णालय उभारण्यात येणार आहे या रुग्णालयाचा गोरगरिबांना फायदा होणार आहे.
हेही वाचा -बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठापनेची योग्य वेळ कोणती; पंचांगकर्ते ओंकार दातेंनी सांगितला मुहूर्त