मुंबई -स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी फोन आल्यावर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणणे सक्तीचे करतील, असा आदेश त्यांनी जारी केला आहे. याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच काढण्यात येणार आहे. सरकारच्या या वंदे मातरमला आता रझा अकादमीने Raza Academy मात्र विरोध केला आहे. या वंदे मातरममुळे चर्चेत आलेली रझा अकादमीयाआधी देखील बऱ्याच वेळा विविध कारणांमुळे चर्चेत आलेली आहे. नेमका काय आहे या रझा अकादमीचा इतिहास यावर टाकलेली एक नजर.
रझा अकादमीची स्थापना :रझा अकादमीची स्थापना 1978 मध्ये झाली होती. रझा अकादमीची स्थापना अलहाज मोहम्मद सईद नूरी यांनी केली होती. अलहाज मोहम्मद सईद नूरी हे 1986 पासून रझा अकादमीचे अध्यक्ष आहेत. इस्लामवादी संघटना रझा अकादमीची स्थापना सुन्नी नेते इमाम-ए-अहमद रझा खान यांच्या कार्याचे प्रकाशन आणि प्रचार करण्यासाठी करण्यात आली. रझा अकादमीने उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये पुस्तके प्रकाशित केली आहेत. 2012 मध्ये रझा अकादमी संस्थेची नोंदणीच नसल्याचे आढळून आले. रझा अकादमीबद्दल सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे तिचे संस्थापक आणि अध्यक्ष सईद नूरी यांनी कधीही औपचारिक इस्लामिक शिक्षण घेतले नव्हते. जेव्हा त्यांनी सुन्नी इस्लामचा नेता बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते शिवणकामाच्या व्यवसायात होते. रझा अकादमीची स्थापना झाली तेव्हा ती एक शैक्षणिक संस्था होती. पण हळूहळू ती सामाजिक संस्था बनली. मुस्लिमांच्या हक्कांसाठी आवाज उठवल्याचा दावा या संघटनेने केला आहे.
अमर जवान ज्योती स्मारकाची तोडफोड :11 ऑगस्ट 2012 रोजी रझा अकादमीने आसाम आणि म्यानमारमधील मुस्लिमांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानावर मोर्चा काढला. रझा अकादमी समुहाने पोलिसांवर हल्ला केल्यानंतर निदर्शनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला आणि 2 जणांचा मृत्यू झाला तर 50 हून अधिक पोलीस जखमी झाले. रझा अकादमीने मुंबई पोलिसांना आश्वासन दिले होते की केवळ 1,500 लोक निषेधासाठी येतील. पण आझाद मैदानावर 15,000 हून अधिक लोक जमले, जे नंतर 40,000 पर्यंत वाढले. आझाद मैदानावरील दंगलीतील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे अमर जवान ज्योती स्मारकाची जमावाने केलेली तोडफोड. नंतर ही बाब उघडकीस आल्यावर पोलिसांनी दंगलीत सहभागी असलेल्या ३५ ते ४० मुस्लिम तरुणांना अटक करण्यासाठी ईदपर्यंत आठवडाभर वाट पाहिल्याचे कळले. या दंगलीत विविध सार्वजनिक मालमत्तेचे सुमारे २.७२ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. अरुप पटनायक हे त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. दंगलीमुळे त्यांची बदली झाली, असे जाणकार सांगतात.