मुंबई- प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांच्यावर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची तुलना तालिबान्यांशी केली असल्याचा आरोप करत देशभरातून जोरदार टीका करण्यात आली. मात्र जगात सगळय़ांत 'सभ्य' आणि सहिष्णू फक्त हिंदूच! हिंदुस्थान कधीच अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये असल्याचे मत अख्तर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी कोणत्याही धर्मात, जगातील कोपऱ्यात तालिबानी प्रवृत्तीचे लोक असू नयेत, असे परखड मतही मांडले आहे.
मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हे आरोप निराधार
जावेद अख्तर म्हणाले की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही. त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा टीकाकारांनी माझ्यावर आरोप केला आहे. मात्र मला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पहिले, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हादेखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होताच, अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे. या सगळय़ांचा परिणाम म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या होत्या.
2010 मध्ये एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी मी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता. मौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्टीकरणही जावेद अख्तर यांनी दिले आहे.
हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू