मुंबई - मुंबईमध्ये सतत पाऊस पडल्यास सर्वात आधी दादर हिंदमाता ( Hindmata ), माटुंगा आणि गांधी मार्केट ( Gandhi Market area ) येथील किंग सर्कल परिसर जलमय होतो. यावर पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे यंदा या दोन्ही परिसरात जास्त वेळ पाणी साचून राहिलेले नाही. यामुळे येथील स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पालिकेने केलेल्या कामांमुळे यंदा पाणी साचण्याचा त्रास झाला नाही अशी माहिती येथील दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी दिली.
पालिकेचे कौतुक -मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात कमी दिवसात जास्त पाऊस पडतो. दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, मिलन सब वे आदी ठिकाणी पाणी साचते. यामुळे वाहतूक ठप्प होऊन मुंबई थांबते. यासाठी पालिकेकडून गेले काही वर्षे ‘ब्रिमस्टोवेड-दोन’ योजनेनुसार उपायोजना केल्या जात आहेत. हिंदमाता येथे उभारण्यात आलेल्या भूमिगत पाणी साठवण टाक्या, किंग सर्कल येथे उभारण्यात आलेली पाणी वाहून नेणारी प्रणाली याची पाहणी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी केली. यावेळी स्थानिक दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी पालिकेने केलेल्या कामामुळे हे शक्य झाल्याचे सांगत पालिकेच्या कामाचे कौतुकही केले आहे.
आमचे नुकसान टळले -गांधी मार्केट गेले ४५ वर्षे पावसात पूरमय होत असल्याने आम्हाला नेहमीच प्रचंड त्रास झाला. दरवर्षी पाण्यामुळे प्रचंड नुकसान होत होते. पावसाळ्यात दहा ते बारा दिवस साचलेल्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत होता. पण यंदा पालिकेने मोठ्या क्षमतेचे सहा पंप बसविले असून त्यांची क्षमता ३ लाख लीटर प्रती मिनिट पाणी उपसण्याची असल्याने तिथे यावेळेस नेहमीप्रमाणे पाणी साचले नाही. पहिल्यांदा आमच्या दुकानांमध्ये पाणी घुसून नुकसान झालेले नाही. असे स्थानिक दुकानदार हरिओम शुक्ला यांनी सांगितले. तर हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. पालिकेच्या उपाय योजनांनी बराच दिलासा मिळाला आहे. यंदा पावसात पाणी साचून नुकसान झाले नसल्याचे स्थानिक दुकानदार रागीन पटेल यांनी सांगितले.