मुंबई -मुंबई उच्च न्यायालयाने आज 35 आठवड्याची गर्भवती बलात्कार पीडित मुलीला आरोग्याच्या धोका पाहता गर्भपाताची परवानगी देण्यास नकार दिला आहे. पीडित तरुणीच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. ( HC decision Regarding Pregnant Woman ) या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत याचिका फेटाळून लावली आहे. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तज्ञ डॉक्टरांच्या समितीने असे निरीक्षण नोंदवले होते की, पीडित मुलीचे गर्भपात केल्यास तिच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या अपंग बलात्कार पीडितेची 35 आठवड्यांची 8.5 महिन्याची गर्भवती असल्याने गर्भपात करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे, उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
डीएनए नमुने गोळा करता येतील - न्यायमूर्ती गंगापूरवाला आणि एएस डॉक्टर यांच्या खंडपीठाने सांगितले, की तज्ज्ञ समितीच्या अहवालावरून न्यायालयाला मार्गदर्शन केले जाईल. परंतु, गर्भधारणा हा बलात्काराचा परिणाम असल्याने काही निर्देश आवश्यक आहेत. पीडित महिला बाळाला जन्म देता वेळी तपासनीस उपस्थित राहिले पाहिजे, जेणेकरुन बाळाला जन्म दिल्यानंतर लवकरच डीएनए नमुने गोळा करता येतील आणि चाचणी दरम्यान वापरता येतील. जर मूल जिवंत जन्माला आले तर 2019 च्या मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयानुसार मुलाची काळजी घेतली पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.