मुंबई- ईडीने हिरे व्यापारी मेहुल चोक्सीच्या वैद्यकीय कागदपत्रांची स्कॅन कॉपी न्यायालयात सादर करावी, या कागदपत्रांची छाननी जेजे रुग्णालयातील हृदय तज्ज्ञांकडून करून त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला सोमवारी दिले आहेत. मेहुल चोक्सीने त्याची वैद्यकीय कागदपत्रे ईडीकडे 1 जुलैपर्यंत सादर करण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या बरोबरच मेहुल चोक्सी भारतात एअर अॅम्ब्युलन्सने येऊ शकतो का अशीही विचारणा ईडीकडे केली आहे.
मेहुल चोक्सीच्या वैद्यकीय कागदपत्रांचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश - ईडी
मेहुल चौक्सीच्या वैद्यकीय कागदपत्रांची स्कॅन कॉपी न्यायालयात सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कागदपत्रांची चाचणी जेजे रुग्णालयातील हृदय तज्ज्ञांकडून करुन त्याचा अहवालही सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मेहुल चोक्सी
हजारो कोटी रुपयांचा बँकेला चुना लावून अँटिग्वा देशात फरार झालेला मेहुल चोक्सीने ईडीने अँटिग्वा येथे येऊन चौकशी करावी असे म्हटले आहे. यावर कारण देताना मागच्या वर्षी आपली बायपास सर्जरी झाली असून विमानाने प्रवास करणे प्रकृतीच्या दृष्टीने शक्य नसल्याचे त्याने म्हटले आहे. मेहुल चोक्सीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस ईडीने काढल्याने अँटिग्वा देश सोडून इतर ठिकाणी उपचारासाठी जाता येत नसल्याचे मेहुल चोक्सीने म्हटले आहे.