नवी मुंबई -2018ला घडलेल्या कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवादप्रकरणी तळोजा कारागृहात असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा चष्मा तळोजा जेलमधून चोरीला गेला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पाठवलेला नवीन चष्मा देण्यास मात्र तळोजा कारागृह प्रशासनाने नकार दिला. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत कैद्यांना वागणूक देताना माणुसकीच्या दृष्टीकोनातून विचार करा, असे खडे बोल तळोजा कारागृह प्रशासनला सुनावले असून फटकारले आहे. शिवाय कैद्यांना कारागृहात मिळणाऱ्या वागणुकीबाबत कारागृह प्रशासनासाठीही आता विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची गरज असल्याचेही हायकोर्टाने म्हटले आहे.
चष्मा नसल्याने अडचणी
चष्मा नसल्याने नवलखा यांना अनेक अडचणी येत असल्याचेही त्यांच्या कुटुंबातील लोकांनी म्हटले आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा हे तळोजा कारागृहात आहेत. 27 नोव्हेंबर रोजी त्यांचा तळोजा कारागृहातून चष्मा चोरीला गेला होता, त्यामुळे नवलखा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्यासाठी कुरिअरने नवीन चष्मा पाठवला. मात्र कारागृह प्रशासनाने तो नवलखा यांना देण्यास नकार दिला असून, चष्माशिवाय ते काहीच पाहू शकत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे त्यांचा रक्तदाब कमी होत असल्याचा दावा त्यांच्या पत्नी साहाबा हुसेन यांनी केला आहे.
माणूसकी जपणेही महत्त्वाचे
काल (मंगळवारी) याची दखल न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने घेतली असून, त्यांचा चष्मा तुरुंगात चोरीला कसा गेला, त्यांच्या कुटुंबीयांनी कुरिअरच्या माध्यमातून पाठविलेला नवीन चष्मा देण्यास तळोजा कारागृह प्रशासनाने नकार का दिला, असे प्रश्न यावेळी खंडपीठाने उपस्थित केले. कोणत्याही कैद्याला कुरीअरद्वारे आलेल्या वस्तू देता येत नाहीत. मात्र जर कुटुंबीयांनी जर स्वत: जेलमध्ये येऊन एखादी वस्तू देण्याची इच्छा व्यक्त केली तर विचार करता येऊ शकतो, असे स्पष्टीकरण कारागृह प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. यावर नियम पाळणे जितके महत्त्वाचे आहे तशी माणूसकी जपणेही सर्वात महत्त्वाचे आहे. इथे तिच कशी विसरली जाते, व्यक्तीच्या दैनंदिन वापरातील लहान-सहान वस्तू कशा काय नाकारता शकतात, असे खडेबोल खंडपीठाने यावेळी तळोजा कारागृह प्रशासनाला सुनावले.