मुंबई -सिटी को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात ईडीने केलेल्या चौकशीविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे, अडसूळ यांना आता ई़डी चौकशीला समोर जावे लागणार आहे.
हेही वाचा -जे काही होईल ते कोर्टात समोर येईल, माझ्यावर दबाव टाकला जात आहे - समीर वानखडे
सिटी को - ऑपरेटिव्ह बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने अडसूळ यांच्या मुंबई व अमरावती येथील घरी छापे टाकले होते. तसेच, चौकशीसाठी ईडीने अडसूळ यांना समन्स देखील बजावले होते. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले होते. दरम्यानच्या काळात अडसूळ यांनी ईडीच्या चौकशीविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ईडीने पाठवलेले समन्स रद्द केले जावे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. मात्र, अडसूळ यांची विनंती न्यायालयाने फेटाळली, तसेच मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्याची सूचना अडसूळ यांना केली.