मुंबई - साठेबाजांकडून पोलिसांनी जप्त केलेले हजारो मास्क, हँड सॅनिटायझर्स, पीपीई कीट्स या वैद्यकीय वस्तू कोरोना विरोधात लढणाऱ्यां (कोरोना वॉरिअर्स) पर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने, माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोहन जोशी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील निर्णयात दिले आहेत.
जप्त केलेले मास्क, हँड सॅनिटायझर्स, पीपीई कीट्स वापरासाठी द्या, न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश - उच्च न्यायालयाचे कोरोना निर्देश
जप्त केलेले हजारो मास्क, हँड सॅनिटायझर्स, पीपीई कीट्स या वैद्यकीय वस्तू कोरोना विरोधात लढणाऱ्यां (कोरोना वॉरिअर्स) पर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, असे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
जप्त केलेल्या वैद्यकीय वस्तू वापरासाठी मिळाव्यात याकरिता बृहन्मुंबई महापालिकेने पोलिसांकडे पत्रव्यवहार केला. त्यानुसार वितरण सुरू केले. त्यामुळे हे प्रकरण प्रलंबित ठेवता येणार नाही. ज्यांना या वस्तू हव्या आहेत त्यांना या वस्तू द्याव्यात आणि राज्य सरकारने वितरणाकडे लक्ष ठेवावे, असे आदेशात नमूद केले आहे. मोहन जोशी यांच्या वतीने अॅड. हर्ष पार्टे न्यायालयीन काम पाहत असून त्यांचे कौन्सिल अॅड. विशाल कानडे यांनी बाजू मांडली.
या आदेशावर प्रतिक्रिया देताना मोहन जोशी म्हणाले, ज्या उद्देशाने आपण ही याचिका दाखल केली होती, त्याला न्याय मिळाला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लढत असलेले डॉक्टर्स, नर्सेस, साफसफाई कर्मचारी, पोलीस यांना या वस्तूंची आवश्यकता आहे. मुंबईत त्याचे वितरण सुरू झाले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व राज्यांमध्ये या वस्तूंचे वाटप होणार आहे, याचे मला समाधान आहे.