मुंबई -बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ही आता अधिकृतरित्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहे. तिच्या पक्ष प्रवेशावरून अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. उर्मिलाला राज्यपाल नियुक्त आमदारकी देऊन शिवसेनेचा नक्की उद्देश काय? यावर नाक्या नाक्यावर चर्चा होत आहेत. तर सोशल मीडियावर देखील या विषयाची चर्चा आहे. मात्र काँगेसवासी झालेल्या उर्मिलाला पक्षात घेण्यामागे पक्षाचा नक्की काय विचार आहे ते पाहुयात..
उर्मिलाचा पक्षप्रवेश आणि एका दगडात अनेक पक्षी -
उर्मिला मातोंडकरने 2019ची लोकसभा निवडणूक काँग्रेस पक्षाकडून लढवली होती. मात्र ऐन निवडणुकीत पक्षातील काही लोकांनी पक्षविरोधी काम केल्याने तिचा या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर पक्षातील पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची तक्रार हायकमांडकडे करून उर्मिलाने काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मात्र काँग्रेसने टाकलेला पत्ता उचलण्यामागे शिवसेनेची मोठी खेळी आहे. सगळ्यात आधी म्हणजे राज्यपालनियुक्त जागांसाठी कला, सांस्कृतिक, सहकार, समाजसेवा आशा क्षेत्रातील नाव असावे असा राज्यपालांचा आग्रह आहे. त्यासाठी फारसा दमदार चेहरा शिवसेनेकडे नाही ती कमतरता उर्मिला भरून काढू शकते.
'या' कारणासाठीच दिला जातोय उर्मिलाला शिवसेनेत प्रवेश - उर्मिला मातोंडकर फॅमिली
उर्मिला मातोंडकरच्या शिवसेना प्रवेशावरून अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. उर्मिलाला राज्यपाल नियुक्त आमदारकी देऊन शिवसेनेचा नक्की उद्देश काय? यावर चांगल्याच चर्चा होत आहेत. तर, काँगेसवासी झालेल्या उर्मिलाला पक्षात घेण्यामागे शिवसेनेचा नक्की काय विचार आहे ते पाहुयात..

बॉलिवूडमधील दोन गट -
2014 च्या लोकसभा निवडणुकांनतर बॉलिवूडमध्ये देखील दोन गट ठळकपणे दिसू लागले. पहिला होता मोदी समर्थक कलाकार तर दुसरा होता मोदी विरोधक कलाकारांचा गट. हे सगळे गट समाज माध्यमावर आपापली बाजू हिरीरीने मांडताना दिसायचे. उर्मिलाने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोदी सरकारच्या अनेक धोरणावर जाहीरपणे टीका केली होती. उर्मिलाचे वाचन चांगले असल्याने आणि घरात समाजवादी विचारांचे बाळकडू मिळाल्याने ती आपले विचार ठामपणे मांडते आणि आपले मुद्दे परखडपणे पटवून देऊ शकते. कलाकार म्हणून आमदारकी देताना ही गोष्ट शिवसेनेला विधान भवनात आणि भवनाच्या बाहेर देखील उपयोगी ठरणार आहे.
तिसरे आणि सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर शिवसेनेवर बॉलिवूडमधून टीकेचा भडिमार होऊ लागला होता. सुशांत समर्थक आणि भाजपची ट्रोल गँग शिवसेनेवर वार करण्यात कोणतीही कसर सोडत नव्हते, त्यातच अभिनेत्री कंगना राणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यानंतर सुरू झालेला संघर्ष सगळ्यांनी पाहिला. मात्र त्यातही उर्मिलाने नेपोटीजम आणि अशापद्धतीने एकांगी टीका करणाऱ्या कंगनाला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर कंगनाने उर्मिलाचा उल्लेख सॉफ्ट पॉर्नस्टार असा करत तिच्यावर टीकाही केली. बॉलिवूडमधून पक्षावर सुरू झालेले हल्ले परतवून लावण्यासाठी शिवसेनेला एक असा चेहरा हवा होता की जो स्वतःदेखील बॉलिवूडमध्ये तेवढाच मोठा असेल, त्याने दिलेल्या प्रतिक्रियेची माध्यम दखल घेतील आणि पक्षाची भूमिका जोरकसपणे मांडली जाईल, या सगळ्यात उर्मिला फिट्ट बसत असल्यानेच पक्षाने तिला संधी देण्याचा निर्णय घेतला असावा, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार अजय वैद्य यांनी ई टीव्ही भारतला दिली आहे.
उर्मिलाच्या पक्षप्रवेशाने पक्षातील काही निष्ठावंत नाराज होण्याची शक्यता असली, तरीही पक्षप्रमुख ही बाब पक्षाच्या नेत्याना समजावून सांगण्यात निश्चित यशस्वी होतील, असेही वैद्य यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. त्यामुळे उर्मिलाच्या पक्षप्रवेशमुळे असे हल्ले परतवून लावण्याचे बळ पक्षाला मिळणार आहे.
हेही वाचा -अभिनेत्री उर्मिला मातोंडकर 'मातोश्री'वर दाखल; थोड्याच वेळात करणार शिवसेनेत प्रवेश