मुंबई -गेल्या अनेक दिवसांपून सरकार मदत करेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना अखेर राज्यपालांनी मदत जाहीर केली. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली मदत, ही अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चही निघणार नाही. म्हणूनच राज्यपालांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि या मदतीत भरीव वाढ करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
हेही वाचा... शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर, राज्यपालांची घोषणा
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे. मात्र राज्यपालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली.
हेही वाचा... महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या निमित्ताने काँग्रेसपुढे संधी आणि आव्हानही!
राज्याच्या काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा गोषवारा काही दिवसांपूर्वी जाहीर केला होता. त्या आकडेवारीचा आधार घेतला तर राज्याच्या सर्व विभागातील जवळपास ३२५ तालुक्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यातही सर्वाधिक नुकसान उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात झाले आहे. राज्यापालांच्या निर्णयामध्ये मदतीकरिता घातलेल्या दोन हेक्टरच्या मर्यादेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील बहुसंख्य शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार नाही. त्यातही ८ हजार रूपये प्रति हेक्टर ही मदत अत्यंत तोकडी आहे. पावसामुळे वाया गेलेल्या फळबागांना मदत म्हणून जाहीर केली, ती प्रति हेक्टरी १८ हजार रूपये अत्यंत अपुरी आहे. मच्छीमार बांधवांना तर राज्यपालांनी कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी या निर्णयाचा फेरविचार करून शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या मदतीत भरीव वाढ करावी ही आमची मागणी आहे, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.