मुंबई - मुंबईत गुरुवारपासून दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्या प्रवाशाने देखील हेल्मेट घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमांचे पालन न केल्यास कडक कारवाईचा इशारा देखील मुंबई पोलिसांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबईत हेल्मेटची विक्री दुपटीने वाढली आहे. दंड भरण्यापेक्षा मुंबईकर हेल्मेट घेणं पसंद करत आहेत.
हेल्मेट मागणी दुपटीने वाढली - यासंदर्भात ईटीव्ही भारतशी बोलताना मुंबईच्या ग्रँट रोड येथील प्रसिद्ध हेल्मेट विक्रेते परशुराम म्हणाले की, "मुंबई पोलिसांनी हा नियम लागू केला आणि लगेचच आमच्याकडे हेल्मेटसाठी मागणी वाढली आहे. याआधी मी दिवसाला नाही म्हटलं तरी आठ ते दहा हेल्मेट विकत होतो. पण, तीच संख्या आता दुपटीने वाढली आहे. एका दिवसात जवळपास वीस ते पंचवीस हेल्मेटची विक्री आमच्याकडून झाली आहे. ही मागणी अजून देखील वाढतेय. उगाच दंड भरायला नको म्हणून लोक आधी हेल्मेट खरेदी करत आहेत आणि नंतर मग पुढील प्रवासाला जात आहेत."
हेही वाचा -Helmet Mandatory Controversy : पुण्यात हेल्मेट सक्ती आहे की नाही? जिल्हाधिकारी म्हणतात...
हेल्मेटचे दर वाढले - पुढे बोलताना परशुराम म्हणाले की, "फक्त हेल्मेटची मागणीच नाही तर हेल्मेटचे दर देखील वाढले आहेत. मागच्या चार ते पाच दिवसात दररोज 10 ते 15 रुपयांची वाढ या हेल्मेटच्या किमतीमध्ये होते. असे मागच्या चार पाच दिवसात जवळपास 40 ते 50 रुपयांची वाढ झाली आहे. एकीकडे हेल्मेटचे दर वाढले असताना लोकमात्र जुन्या किमती प्रमाणे हेल्मेटची मागणी करत आहेत. बरीच लोक पोलिसांच्या या नवीन नियमामुळे नाराज देखील झाली आहेत. ती लोक हेल्मेट घेताना येथं बोलून दाखवतात."
कोरोनामुळे आधीच मंदी, सरकारने विचार करावा - याच दुकानात हेल्मेट घेण्यासाठी आलेले ग्राहक प्रकाश अलाहाबादी म्हणाले की, "मी इथं माझ्या मुलांसाठी हेल्मेट घ्यायला आलोय. आमच्याकडे एक टू व्हीलर आहे जी मुलं चालवतात. आधीच पोलिसांनी दंडाची रक्कम खूप वाढवून ठेवलेय त्यात आता हा नवीन नियम. कोरोनामुळे आमचा धंदा ठप्प झाला. त्या नुकसानीतून आम्ही अजून वर आलेलो नाही. त्यात या नवीन नियमांची भर पडली. दंडांच्या पैशाचे टेंशन वाढवून ठेवले. हा दंड भरावा लागू नये म्हणून मी हेल्मेट घ्यायला आलोय. माझी सरकारला विनंती आहे त्यांनी या नियमाबाबत आणि दंडाच्या रकमेबाबत थोडा विचार करावा."
काय आहे नियम - मुंबई वाहतूक पोलिसांच्या नव्या नियमानुसार आता टू व्हीलर चालका सोबतच मागे बसणाऱ्या सहप्रवाशांनी देखील हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मागे बसणारी व्यक्ती बिना हेल्मेट आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. एखादा सहप्रवासी बिना हेल्मेट आढळल्यास त्याला पाचशे रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. एकच नाही तर संबंधित वाहनचालकाचा परवाना देखील तीन महिन्यांसाठी रद्द होऊ शकतो. त्यामुळे, आता मुंबईकरांनो आळशीपणा सोडा आणि हेल्मेट दुकानात जा आणि आपल्यासह प्रवाशांसाठी हेल्मेट घ्या. कारण माणसाचा जीव महत्त्वाचा आहे.
हेही वाचा -Action By Traffic Police : हेल्मेट सक्तीच्या निर्णयानंतर 6 हजार 271 बाईकस्वारांवर कारवाई