मुंबई -मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) पडत आहे. मुसळधार पावसामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation ) क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव ( Powai Lake ) काल सायंकाळी ६:१५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
औद्योगिक वापरासाठी पाणी - ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरली जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे देण्यात आली आहे.
पवई तलाव बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर ( सुमारे १७ मैल ) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले आहे. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे आहे. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर पाणी असते. ( ५४५५ दशलक्ष लिटर ) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.
लोकल सेवा ठप्प -मुंबईत बुधवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस गुरुवारीही जोरदार बरसला. याचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला. रात्री ८.४५ क्या सुमारास दादर येथे पॉइंट फेलीयर मुळे लोकल सेवा ठप्प झाली. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडून ठाणे कडे जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या रांगा लागल्या. याचा फटका कामावरून घरी जाणाऱ्या प्रवाशांना बसला. रात्री १०.१० वाजता सुमारे दीड तासाने लोकल सेवा सुरू झाली. मात्र लोकल सेवा धिमा गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल झाले.