मुंबई - मुंबईत बुधवारपासून पावसाला सुरुवात झाली. बुधवारी मुंबईची तुंबई झाली. गेले दोन दिवस कमी प्रमाणात पाऊस पडला. मात्र, आज पुन्हा पावसाने जोर धरला, यामुळे आज पुन्हा मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. दुपारी समुद्राला मोठी भरती होती. यादरम्यान पाऊस पडत राहिला असता तर मुंबईची पुन्हा तुंबई झाली असती. मात्र, दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना सुटकेचा निश्वास टाकला. रविवारी व सोमवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका, असे आवाहनही हवामान विभागाने केले आहे.
हेही वाचा -मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी 633 दिवसांवर, आज 733 नवे रुग्ण आढळले
वाहतुकीवर परिणाम -
मुंबईत मागील चार दिवसांपासून पावसाने जोर कायम ठेवला आहे. बुधवारी व गुरुवारी धो धो कोसळलेल्या पावसामुळे मुंबईत पडझडीच्या घटना घडल्या. मालाड-मालवणीत दुमजली घर कोसळून १२ जणांचा, तर दहिसर केतकीपाडा येथे घर कोसळून एकाचा, असा १३ जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पावसाने दुपारनंतर काहीशी उसंत घेतली. मात्र, पुन्हा रात्री पावसाने जोरदार बरसण्यास सुरुवात केली. सकाळी पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली. पाऊस त्यात दुपारी १.३० ते ४.३४ समुद्राला भरती होती. त्यामुळे, सखल भागात पाणी साचले. अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला.
रेल्वे वाहतूक विस्कळीत
चुनाभट्टी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने लोकल गाड्या काही वेळ जागीच खोळंबल्या होत्या. दादर ते कुर्ला दरम्यान सर्व लोकल सेवा बंद करण्यात आल्या. तर, हार्बर मार्गावरील चुनाभट्टी दरम्यान अत्यंत धिम्या गतीने लोकलला वेगमर्यादा ठेवून लोकल सुरू ठेवण्यात आली. त्यामुळे, अनेक प्रवासी लोकलमध्ये अडकून पडले होते. दादर ते कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान लोकल सेवा दुपारी १२.१५ वाजता बंद केली होती. मात्र, दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याने मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. दुपारनंतरही काही ठिकाणी अधून मधून पावसाच्या सरी बरसत होत्या.
रविवार - सोमवार मुसळधार
मुंबईत येत्या १३ व १४ जून रोजी मुंबई शहर व उपनगरांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. विभागीय नियंत्रण कक्षांसह इतर सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना पालिकेकडून देण्यात आल्या आहेत. या कालावधीत नागरिकांनी समुद्र किनारी व समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन पालिकेने केले.
येथे साचले पाणी -
दादर, परळ, वडाळा, हिंदमाता, सायन, कुर्ला, चुनाभट्टी, चेंबूर, टिळकनगर, मिलन सबवे, अंधेरी, किंग्जसर्कल, बीकेसी आदी ठिकाणी पाणी साचले होते.
मिलन सबवे पाण्याखाली
अंधेरी फाटक आणि मिलन सबवेमध्ये पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. या भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अंधेरी सबवेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलीस तैनात ठेवण्यात आले होते.
बिकेसी कोविड सेंटर परिसरात पाणी साचले