महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Heavy Rain In Mumbai : मुंबईत पावसामुळे दाणादाण; पुढील २४ तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता - Mumbai flooded

पुढील २४ तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस ( Heavy Rain In Mumbai ) पडेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, आज (शुक्रवारी) सकाळपासून पावसाचे प्रमाण कमी ( Mumbai receives less rainfall ) झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये बुधवारी रात्री पासून पावसाला सुरुवात झाली असून गुरुवारीही पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचले ( Mumbai flooded ) होते. यामुळे रेल्वे आणि वाहतूक व्यवस्था काहीशी मंदावली ( Railway slowed down ) होती.

Moderate to heavy rains in Mumbai in next 24 hours
पुढील २४ तासात मुंबईत मध्यम ते मुसळधार पाऊस

By

Published : Jul 1, 2022, 8:42 PM IST

Updated : Jul 1, 2022, 10:55 PM IST

मुंबई :मुंबईत ११ जूनला पावसाळा सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली होती. बुधवारी २९ जून पासून पावसाने पुन्हा हजेरी लावली. गुरुवारी पावसाने मुंबईमध्ये अनेक भागात पाणी साचले होते. गेल्या २४ तासात कुलाबा येथे २२७.८ तर, सांताक्रूझ येथे १७५.५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कुलाबा येथे २८.२, सांताक्रूझ येथे ५१.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालिकेच्या पाऊस मोजणी केंद्रांवर शहर विभागात ४६, पूर्व उपनगरात ५५, पश्चिम उपनगरात ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज कमी प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबई शहर व उपनगरातील रेल्वे, रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे, अशी माहिती पालिकेच्या आपतकालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

मुंबईत पावसामुळे दाणादाण; पुढील २४ तासात आणखी पाऊस पडण्याची शक्यता

पाण्याचा निचरा संथगतीने -मुंबई शहर, उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे शहरात सायन रोड नंबर २४, पुर्व उपनगरात -चेंबुर फाटक, सुंदरबाग कमानी, पश्चिम उपनगरात - सरोदापाडा, विरादेसाई रोड़ येथे साचलेल्या पाण्याचा संथ गतीने निचरा होत आहे.शहरात ३ पूर्व, उपनगरात १ एकूण ४ ठिकाणी घरांचा काही भाग पडण्याची घटना घडल्या आहेत. संबंधित विभागामार्फत घटनास्थळी मदतकार्य रवाना करण्यात आले आहे.

मुंबई शहर, उपनगरात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे पाण्याचा संथ गतीने निचरा

२३ ठिकाणी झाडे पडली -शहारात ५, पूर्व उपनगरात ९, पश्चिम उपनगरात ९, अशा एकूण २३ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. सर्व तक्रारी पडताळणीकरिता संबंधित विभागांना कळविण्यात आल्या आहेत. झाडे उचलण्याचे काम सुरु असून यात कोणालाही मार लागलेला नाही.शहरात २ ठिकाणी शॉर्टसर्किट होण्याच्या घटना घडल्या आहेत. संबंधित विद्युत पुरवठा यंत्रणांना कळवून मदतकार्य रवाना करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांकरिता वर्तविलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर, उपनगरात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले

पावसामुळे दाणादान -गुरुवारी सकाळी ८ ते आज शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मुंबई शहरात १७९.१३, पूर्व उपनगरात १०९.०६ तर पश्चिम उपनगरात १४०.५८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सतत पडणाऱ्या पावसामुळे मिलन सबवे परिसरात पाणी तुंबले होते. अर्ध्या तासात पाण्याचा निचरा झाल्यानंतर मिलन सबवे वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. रात्री ८ नंतर जोरदार पाऊस पडल्याने दादर हिंदमाता, काळाचौकी, दादर, शीव स्थानक, शीव-माटुंगादरम्यान, हिंदमाता, माहीम, भक्ती पार्क, दादर-परळ दरम्यान, कुर्ला-शीव दरम्यान, एस व्ही रोड (अंधेरी पश्चिम), कुर्ला एल वॉर्ड परिसर आदी सखल विभागात पाणी साचले होतो. दरम्यान काळबादेवी बादमवाडी, सायन येथे दोन इमारतींचा काही भाग कोसळल्याचा घटना घडल्या आहे. तसेच पेडर रोड येथे दरड कोसळली. या दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी झाल्याची माहिती उपलब्ध नाही.

मुंबईकरांना काहीसा दिलासा

बदलापूर राज्य मार्ग पाण्याखाली - कल्याण आणि बदलापूर या शहरांना जोडणारा राज्यमार्ग पुन्हा शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यमार्गावरील अंबरनाथ शहरातील पश्चिमेचा मोठा भाग पाण्याखाली गेला. या राज्यमार्गावर असलेल्या ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या परिसरात एक फुटापर्यंत पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. कल्याण, उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून हा राज्यमार्ग जातो. कल्याणसारखे तालुक्याचे ठिकाण, उल्हासनगरसारखे व्यापारी शहर, अंबरनाथ सारखे औद्योगिक शहर आणि बदलापूर या मार्गाने जोडले जाते. याच मार्गावरून मुरबाड आणि कर्जतला जाणे सोयीचे ठरते. या राज्यमार्गाची उभारणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हा राज्यमार्ग सहा पदरी केला जातो आहे. बहुतांश भागात या राज्य मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था या राज्यावर मार्गावर उभारण्यात आली नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचते.

पावसामुळे मुंबईत वाहतूक व्यवस्था मंदावली

वाहतुकीचा मोठा खोळंबा -शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही मिनिट पडलेल्या या पावसामुळे कल्याण बदलापूर राज्य मार्गावर पुन्हा एकदा पाणी साचले. अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या भागात सुमारे एक फुटापर्यंत पाणी साचले होते.या पाण्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. मोठी वाहने सहजरित्या पाण्यातून निघत होती. मात्र दुचाकी, लहान चार चाकी आणि रिक्षा चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने दुचाकी बंद पडल्या. रिक्षांच्या बाबतही हीच समस्या निर्माण झाली. त्यामुळे स्वतः प्रवाशांना उतरून रिक्षाला धक्का मारण्याची वेळ आली होती. अर्धा तासापर्यंत या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. रस्ता निर्मिती करताना पाण्याचा निचरा होईल अशी प्रभावी व्यवस्था असणे आवश्यक होते. मात्र ही व्यवस्था प्रभावी न झाल्याने राज्य मार्गावर पाणी तुंबल्याचा आरोप होतो आहे. सोबतच अंबरनाथ नगरपालिकेतर्फे केल्या गेलेल्या नालेसफाईवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

हेही वाचा -Save Aarey Forest Movement : आरे वाचवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार पर्यावरणवादी संघटनांचा इशारा

Last Updated : Jul 1, 2022, 10:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details